पनवेल महापालिका ऍक्शन मोडमध्ये! कोविड  रुग्णालयांची तपासणी सुरु!

पनवेल महापालिकेने ४४ खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. त्या रुग्णालयांना नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

सध्या राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे, अशा वेळी पर्याय म्हणून राज्यात खासगी रुग्णालयांनाही कोविड रुग्णालये उभे करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. अशा रुग्णालयांना सुरक्षेच्या दृष्टीने नियमांचे पालन करण्याचाही आदेश दिला आहे. परंतु काही रुग्णालयांमध्ये नियम धाब्यावर बसवले जात आहेत, त्यामुळे अशा रुग्णालयांमध्ये अपघात घडत आहेत. म्हणून पनवेल महापालिकेने आता त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या कोविड रुग्णालयांची पाहणी करण्यासाठी भरारी पथक नेमले असून हे पथक आता नियम मोडणाऱ्या कोविड रुग्णालयांना नोटीस पाठवत आहे.

४४ खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय उभारण्याची परवानगी!

पनवेल महापालिकेने ४४ खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. त्या रुग्णालयांना नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामध्ये अग्निशमन सुविधा, ऑक्सिजन सुविधा, शासनाच्या नियमाप्रमाणे ८० टक्के खाटा कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवणे, रुग्णालयांचे निर्जंतवणुकीकरण करणे तसेच रुग्णालयात किती खाटा आणि ऑक्सिजन बेड रिकामे आहेत याची माहिती देणारा माहिती फलक दर्शनी भागात लावणे अशी नियमावली महापालिकेने ठरवून दिली आहे. त्या नियमांचे खासगी रुग्णालयांकडून पालन होते का, हे पाहण्यासाठी पनवेल महापालिकेने ३ डॉक्टरांचे भरारी पथक नियुक्त केले आहे. हे पथक दररोज १० रुग्णालयांना भेटी देत आहे.

(हेही वाचा : वाझेचा ‘शाही’ थाट… कोठडीत हवी खुर्ची आणि गादी! वाचा काय आहे कारण)

१२ रुग्णालयांना नोटीस!

अशा प्रकारे या पथकाला आतापर्यंत १२ रुग्णालयांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. त्यांना या पथकाने नोटीस पाठवली आहे. या पथकाकडून कडक कारवाई केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here