मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाप्रमाणेच आता पनवेल महानगरपालिका (Panvel Municipal Corporation) संसर्गजन्य आजारांवरील उपचारांसाठी विशेष रुग्णालय उभारणार आहे. या रुग्णालयात सुरुवातीला ५२ खाटा असतील. क्षयरोग, कोविड, स्वाइन फ्लू आणि इतर संसर्गजन्य आजार असलेल्या रुग्णांवर येथे उपचार केले जातील. ज्या रुग्णांना खासगी रुग्णालयात जाणे परवडत नाही, अशा रुग्णांना कमी दरात दर्जेदार उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी हे रुग्णालय बांधण्यात येणार असून या रुग्णालयाचे बांधकाम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती पनवेल महानगरपालिकेकडून (PMC) देण्यात आली आहे.
कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयाच्या बांधकामाचे नियोजन करण्यात आले आहे तसेच भविष्यात महामारीसारखी परिस्थिती उद्भवलीच , तर अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी पनवेल महानगरपालिका आपल्या आरोग्य सेवा वाढवत आहे. त्यामुळे प्रशासनाने संसर्गजन्य आजारांवर मात विशेष रुग्णालयाची आवश्यकता असल्याचे ओळखून आजारांवर उपचार करण्यासाठी कळंबोली येथे हे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(हेही वाचा – Mumbai Nirbhaya Project : मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया प्रकल्पाची अंमलबजावणी)
कसे असेल ‘हे’ रुग्णालय…
कळंबोली येथे सिडकोने बांधलेल्या सामुदायिक केंद्रात हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. सुरुवातीला 52 खाटांचे रुग्णालय असेल, ज्यात भविष्यात 24 खाटांची भर घातली जाईल. अभियांत्रिकी विभागाने आस्थापनेच्या खर्चासाठी ₹15 कोटी खर्च करण्याची योजना आखली आहे. 52 ऑक्सिजन सुसज्ज खाटा आणि 6 आयसीयू खाटा असतील. क्षयरोग, कोविड, स्वाइन फ्लू, लेप्टो, डेंग्यू, कावीळ, मलेरिया आणि अशा इतर संसर्गजन्य आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांवर या रुग्णालयात उपचार केले जातील. या रुग्णालयात 24×7 डॉक्टर तैनात असतील. या रुग्णालयात निवासी डॉक्टरांव्यतिरिक्त तीन पूर्णवेळ एम. डी. डॉक्टर आणि 9 एम. बी. बी. एस. डॉक्टर शिफ्टमध्ये काम करतील. रुग्णालयासाठी शल्यचिकित्सकांचीही भरती केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे.
गरीब रुग्णांसाठी वरदान
पुढे देशमुख म्हणाले की, “एकदा रुग्णालय तयार झाले की, रहिवाशांना मुंबईत जावे लागणार नाही आणि शहरातच परवडणाऱ्या दरात दर्जेदार उपचार मिळतील”. ते पुढे म्हणाले, “बीएमसी संचालित रुग्णालयानंतर आता ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई, पनवेल, उरण, खोपोली, खालापूर, अलिबाग, रोहा, माणगाव आदी भागांना या नागरी रुग्णालयाच्या माध्यमातून सांसर्गिक आजारांपासून दिलासा मिळणार आहे. हा एक स्वागतार्ह निर्णय आहे कारण सांसर्गिक आजारांसाठी पीएमसी रुग्णालय गरीब रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे.”
हेही पहा –