Panvel-Nanded Express : पुण्यात रेल्वे झुरळांमुळे रखडली

131

रेल्वे खोळंबण्याची अनेक कारणे आपल्याला ठाऊक असतात , कुणी चैन ओढली, रेल्वे रूळ तुटला, पाणी रुळावर पाणी साचले, पण यात आणखी एका आश्चर्यकारक कारणाची भर पडली आहे. चक्क झुरळांमुळे रेल्वे तब्बल दोन तास खोळंबल्याची घटना नुकतीच पुण्यात पाहायला मिळाली आहे. झुरळांमुळे पनवेल-नांदेड एक्सप्रेस पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी तब्बल दोन तास थांबवली होती. या रेल्वेत इतकी झुरळं होती की प्रवास करणं प्रवाशांसाठी अशक्य झालं होतं.

अखेर ही रेल्वे प्रवाशांनी पुणे स्थानकावर थांबवली. पेस्ट कंट्रोल केल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नाही अशी कठोर भूमिका प्रवाशांनी घेतली. शेवटी रेल्वे प्रशासनाने पेस्ट कंट्रोल केल्यानंतरच प्रवाशांनी रोखून धरलेली पनवेल-नांदेड एक्सप्रेस पुढे सोडण्यात आली. या घटनेचा व्हिडीदेखील व्हायरल होत आहे. या रेल्वेने प्रवास करणारा एक प्रवासी कैलास मंडलापुरे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही पनवेल-नांदेड रेल्वे क्रमांक १७६१३ ने प्रवास करत आहोत. मी या रेल्वेच्या बी १ या एसी कोचमधून प्रवास करतोय. प्रवासादरम्यान, प्रवाशांच्या अंगावर झुरळं पडत आहेत. या ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात झुरळं आहेत. ही झुरळांनी भरलेलेली ट्रेन आहे.

प्रवासी मंडलापुरे यांनी सांगितलं की, या ट्रेनमध्ये महिला, वृद्ध, लहान मुलं, नवजात बाळंसुद्धा आहेत. सर्वांना या झुरळांनी हैराण केलं आहे. आम्ही रेल्वे प्रशासनाकडे याबद्दल तक्रार करूनही रेल्वे प्रशासन कुठलीही कारवाई करायला तयार नाही. सव्वा तासापासून ही रेल्वे पुणे स्थानकावर उभी आहे. दरम्यान, प्रवाशांनी आपली मागणी लावून धरल्यानंतर अखेर या रेल्वेत पेस्ट कंट्रोल करण्यात आलं. त्यानंतर दोन तासांनी ही ट्रेन नांदेडकडे रवाना करण्यात आली.

(हेही वाचा Earthquake : चीन भूकंपाने हादरला; १२६ इमारती कोसळल्या)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.