मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणा-यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा वाहतुकीसाठी पुन्हा एकदा बंद केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या महामार्गावरुन प्रवास करणा-यांना त्रास सहन करावा लागू शकतो.
घाटातील वाहतूक राहणार बंद
दरड कोसळल्यामुळे पावसाळ्यात परशुराम घाट बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या घाटातील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नेमका कधीपासून हा घाट बंद राहणार आहे याची माहिती अजून मिळालेली नाही. पण लवकरच त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल.
(हेही वाचाः PSI पद भरतीत ट्रान्सजेंडरसाठी जागा रिक्त ठेवा, MAT चे सरकारला आदेश)
चौपदरीकरणाच्या कामासाठी राहणार बंद
गेल्या वर्षीपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. पावसाळ्यात दरड कोसळल्यानंतर संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हा घाट महिनाभर बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे या घाटातील वाहतूक ही वळवण्यात आली होती. रस्त्यावरील दरड हटवल्यानंतर घाटातून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. त्यानंतर पुढच्या 15 दिवसांत वाहतूक सुरळीत झाली होती. आता पावसाळ्यानंतर चौपदरीकरणाच्या कामाला वेग देण्यासाठी घाटातील वाहतूक बंद ठेवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community