पार्ले महोत्सवाने (Parle Mahotsav 2023) अनेकांना व्यासपीठ दिले, त्यातून उत्तम संघटक आणि नेतृत्व करणाऱ्यांबरोबर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आणि कलाकार निर्माण केले, त्यांनी राज्याचे आणि देशाचे नाव मोठे केले, त्यामुळेच या महोत्सवात प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे, असे विचार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्ले महोत्सव २०२३ च्या उद्घाटन प्रसंगी केले. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ओळखली जाते तसेच पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जात आहे, मुंबईतील मोठा महोत्सव अशी पार्ले महोत्सवाने ओळख निर्माण केली आहे. संस्कृती (Culture), खाद्य संस्कृती (Cusine) आणि कलाकार (Celebrity) यामुळे पार्लेची विशेष ओळख असून या महोत्सवात सहभागी झाल्याचा आनंद झाला. पार्ले महोत्सवाचे दरवर्षी (Parle Mahotsav 2023) उत्कृष्ट आयोजन करण्यात येत असल्याने या महोत्सवाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात आणि हा महोत्सव त्यांना आपला वाटतो. येणाऱ्या काळात येथील फॅनेल झोन आणि विमानतळ जवळील झोपडपट्टी पुनवर्सन विषय मार्गी लावण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
विविध ३२ स्पर्धांमधून सुमारे ३० हजार स्पर्धक सहभागी होत
यंदाचे पार्ले महोत्सवाचे २३ वे (Parle Mahotsav 2023) वर्ष असून विविध ३२ स्पर्धांमधून सुमारे ३० हजार स्पर्धक सहभागी होत आहेत. या महोत्सवाचे वामन मंगेश दुभाषी मैदानावरील शानदार सोहळ्यात मशाल प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार पूनम महाजन, महोत्सवाचे मुख्य आयोजक आणि आमदार पराग अळवणी, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, अभिनेते शैलेंद्र दातार, अभिनेत्री सुधा चंद्रन, नगरसेविका ज्योती अळवणी, अनिल गानू, माधव राजवाडे, डॉ. अलका मांडके आणि अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. पार्ले महोत्सवाचे आयोजक पराग अळवणी यांनी या महोत्सवातून अनेक नेतृत्व करणारी मंडळी घडवली. त्यामुळेच त्यांना सुपर लीडर म्हणता येईल, तसेच पार्लेकर हा महोत्सव घरचे कार्य समजून येतात, हे विशेष, यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षित असलेली खेलो इंडियाची चळवळ पुढे जात असल्याचे खासदार पूनम महाजन यांनी सांगितले.
आतापर्यंत ३.५ लाख स्पर्धकांनी यात भाग घेतला
आपल्या प्रास्ताविकात बोलताना पराग अळवणी यांनी सांगितले की, पार्लेकरांनी गेल्या २३ वर्षांत या महोत्सवाला (Parle Mahotsav 2023) भरभरून दिले, त्यामुळेच आतापर्यंत ३.५ लाख स्पर्धकांनी यात भाग घेतला. यातून अनेक कार्यकर्ते तयार झाले. त्यामुळे आता हा महोत्सव ऑटो मोडवर आहे, असे म्हणता येईल. इथले स्पर्धक जागतिक स्तरावर नावलौकिक करत आहेत, ही आनंदाची बाब आहे. सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी एखाद्या गोष्टीत सातत्य ठेवणे आणि प्रचंड प्रमाणावर प्रतिसाद मिळणे, ही यशाची पोचपावती असून पार्ले महोत्सवाचे आयोजक आणि प्रशिक्षक यांच्याकडे त्याचे श्रेय जाते, असे सांगितले. या महोत्सवाच्या शानदार गीताचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मयूरेश माडगांवकर आणि कलाकारांनी त्याची निर्मिती केली आहे. यावेळी जान्हवी जाधव, अक्षय तरळ या महोत्सवातून पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी केलेल्या खेळाडूंचा तसेच प्रशिक्षक गणेश देवरूखकर यांचा आणि सारेगम स्पर्धेची उपविजेती पार्लेकर श्रावणी वागळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रारंभी श्रावणी वागळे हिच्या गाण्याने तसेच हास्यकलाकार समीर चौगुले आणि चेतना भट यांच्या प्रहसनाने कार्यक्रमात रंगत आणली.
Join Our WhatsApp Community