कोकणात जाताय? परशुराम घाट ३ एप्रिलपर्यंत दररोज ६ तास राहणार बंद!

88

मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाट ३ एप्रिलपर्यंत दररोज सहा तासांसाठी बंद राहणार आहे. सध्या जवळपास ५ किलोमीटर अंतराच्या घाटातील चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. संपूर्ण घाटाचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू होऊन हा घाट पूर्ण क्षमतेने आणि सुरक्षितपणे वाहतुकीस खुला व्हावा, यासाठी शासकीय यंत्रणेसह संबंधित ठेकेदार कंपनीने नियोजन केले आहे.

( हेही वाचा : एकाच दिवशी ४२ लक्षवेधी पटलावर ठेवण्याचा विधानसभेत विक्रम )

घाटातील शेवटच्या टप्प्यातील अवघड ठिकाणचे चौपदरीकरण करण्यासाठी सोमवार दिनांक २७ मार्चपासून सुरुवात होणार असून हे काम दिनांक ३ एप्रिलपर्यंत सुरू राहिल. या काळात दुपारी १२ ते सायंकाळी ६ पर्यंत घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, प्रादेशिक परिवहन विभागाला पाठवण्यात आलेल्या पत्रानुसार, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून २१ मार्च रोजी घाटातील शेवटच्या टप्प्यामध्ये असलेल्या चौपदरीकरणाचे काम करण्यासाठी काही काळ वाहतूक बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार हा निर्णय झाला आहे. सद्यःस्थितीत घाटातील कामाच्या प्रगतीचा अहवाल लक्षात घेता घाटाची लांबी ५.४० कि.मी. असून त्यापैकी ४.२० कि.मी. लांबीतील चौपदरीकरण आणि काँक्रीटचे काम पूर्ण झाले आहे. सध्या वाहतूक सुरळीत आहे. मात्र सुमारे १.२० कि.मी. लांबीचा रस्ता उंच डोंगररांगा व खोल दऱ्यांचा आहे. त्यामुळे तेथे काम करणे अवघड होत आहे. या लांबीमध्ये सुमारे २५ मीटर उंचीपर्यंत डोंगराचे खोदकाम आहे. हे काम चार टप्प्यांमध्ये सुरू आहे. या चारपैकी तीन टप्प्यातील खोदकाम पूर्ण झाले आहे, तर चौथ्या टप्प्याचे काम सुरू करण्यात आले आहे. चौथ्या टप्प्यातील १०० मीटरमध्ये होणारे काम मोठ्या प्रमाणात अवघड स्वरूपाचे आहे. हे काम करताना घाटातील दगड-माती महामार्गावर येऊन अपघाताची शक्यता आहे. या सर्व बाबी लक्षात घेत शेवटच्या टप्प्यातील अवघड मार्ग असलेले हे काम पूर्ण करण्याकरिता ३ एप्रिलपासून आठ दिवस दुपारनंतर महामार्ग वाहतुकीसाठी सहा तास बंद ठेवावा लागणार आहे.

पर्यायी मार्ग

या कालावधीत हलकी वाहने चिपळूण-आंबडस मार्गे वळविण्यात येणार आहेत. अवजड वाहनांची वाहतूक कोणत्या मार्गावरून केल जावी, याबाबत तात्काळ अहवाल मागविण्यात आला आहे, असे महामार्ग विभागातर्फे सांगण्यात आले. सलग सहा दिवस काम चालणार असल्याने महामार्गावरची वाहतूक बंद राहणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.