फोर्ट परिसरात इमारतीचा भाग कोसळला! 5 जण ढिगा-याखाली अडकले

आतापर्यंत 34 रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून, 5 जण इमारतीच्या ढिगा-याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई उपनगरातील मालाड येथे काही दिवसांपूर्वीच इमारत कोसळल्याची घटना घडली असताना, आता मुंबई शहर येथे शुक्रवारी इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. दक्षिण मुंबईच्या फोर्ट परिसरात सकाळी 7.30 वाजता एका पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळला. ही इमारत म्हाडाची असल्याची माहिती मिळत आहे. या इमारतीतून रहिवशांना सुखरुप बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत 34 रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून, 5 जण इमारतीच्या ढिगा-याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बचावकार्य सुरू

फोर्ट सारख्या मुंबईतील सर्वात उच्चभ्रू परिसरात ही दुर्घटना घडली आहे. जुन्या झालेल्या म्हाडाच्या या इमारतीची डागडुजी करण्यात येत होती. त्या दरम्यान इमारतीची पडझड झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने तातडीने बचावकार्याला सुरुवात केली असून, 34 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात त्यांना यश आले आहे. हे सर्वजण सुखरुप असून कोणालीही गंभीर दुखापत झालेली नाही. ढिगा-यात अडकलेल्या 5 जणांना बाहेर काढण्याचे काम सध्या सुरू आहे.

(हेही वाचाः यापुढे महामुंबईत इमारत कोसळली तर गंभीर परिणाम होतील! उच्च न्यायालयाचा इशारा )

उच्च न्यायालयाने होते खडसावले

१५ मेपासून आतापर्यंत इमारत कोसळण्याच्या चार दुर्घटना घडल्या. त्यात २४ लोकांचे जीव गेले, तर २३ जण जखमी झाले. चार घटनांपैकी दोन घटना मुंबईतील आहेत. हे सर्व काय चालले आहे? मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महापालिकांना आम्ही स्पष्टपणे सांगतो की, कोणत्या इमारती धोकादायक आहेत त्याचा आढावा घ्या, यापुढे इमारत कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आणि त्यात लोकांचे जीव गेले, तर आम्ही त्याची अत्यंत गंभीर दखल घेऊन अत्यंत कठोर भूमिका घेणार आहोत, असा निर्वाणीचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी खंडपीठाने काही दिवसांपूर्वी दिला होता.

(हेही वाचाः धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिंदेंनी दिले आदेश)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here