कर्जतमध्ये उधळली पार्टी; ३४ उच्चभ्रू पर्यटकांवर गुन्हा दाखल

कर्जत पोलिस ठाण्यात भा.द.वि. कलम 188, 269, 270, 271, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये तसेच सिगारेट आणि तंबाखू उत्पादने अधिनियम 2003 कलम 4 आणि 21 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

122

इगतपुरी येथील रेव्ह पार्टी उद्ध्वस्थ केल्यानंतर सोमवारी, २८ जून रोजी कोरोनाचे नियम धुडकावून कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथील अव्हिज व्हिलेज फार्महाऊसमध्ये आयोजित केलेली मुंबईतील उच्चभ्रू वस्तीतील पर्यटकांची पार्टी कर्जत पोलिसांनी उधळून लावली आहे. पोलिसांनी धाड टाकून केलेल्या या कारवाईत 34 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई!

रायगड पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तरीदेखील नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांची तपासणी करून उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला जात आहे. कर्जत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूचा संसर्ग होईल व सार्वजनिक सुरक्षा धोक्यात येईल, या कारणास्तव रायगड जिल्हाधिकारी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात कोविड प्रतिबंधात्मक आदेश पारीत केले आहेत. असे असताना कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथील अविज व्हिलेज फार्महाऊस रेस्टॉरंट येथे पार्टी सुरु असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलिस निरीक्षक संदिपान सोनावणे यांना मिळाली.

(हेही वाचा : पोटापाण्यासाठी प्रवासी मोडतात कोरोना नियम! विनातिकीट करतात लोकल प्रवास! )

फार्महाऊस, रेस्टॉरंट मालकांचे धाबे दणाणले

याबाबत त्यांनी कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण भोर यांना कळवले. कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या परवानगीने सहायक पोलिस निरीक्षक संदिपान सोनावणे यांनी कर्मचाऱ्याना घेऊन वंजारवाडी येथील अविज व्हिलेज फार्महाऊस रेस्टॉरंटवर धाड टाकली. यावेळी तेथे भरपूर लोकांची गर्दी असलेली आढळून आले. यात मुंबईतील उच्चभ्रू वस्तीतील एकूण 34 तरुण-तरुणींचा समावेश असून, त्यांच्यावर कर्जत पोलिस ठाण्यात भा.द.वि. कलम 188, 269, 270, 271, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये तसेच सिगारेट आणि तंबाखू उत्पादने अधिनियम 2003 कलम 4 आणि 21 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदिपान सोनावणे हे करीत आहेत. दरम्यान, कर्जत पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे तालुक्यातील फार्महाऊस रेस्टॉरंट मालकांचे धाबे दणाणले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.