मध्य रेल्वे प्रशासनाने आरक्षण नसलेल्या गाड्यांना सिझन तिकीट म्हणजेच मासिक पासची सुविधा सुरू केली आहे. याचा फायदा केवळ सोलापूर विभागातून धावणाऱ्या फक्त पॅसेंजर गाड्यांनाच होणार आहे. त्यामुळे दररोज एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करताना प्रवाशांना पूर्ण तिकीट काढूनच प्रवास करावा लागत आहे. याचा फटका ३ हजार पासधारकांना बसत आहे.
सोलापूर विभागातून धावणाऱ्या कोणत्याही एक्स्प्रेस गाड्यांसाठी सिझन तिकिटाची सुविधा उपलब्ध नाही. दररोज सोलापूरहून कुर्डूवाडी, वाडी, पुणे, मुंबई, विजापूर, गुलबर्गा, दौंड आदी ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक्स्प्रेस गाड्यांमध्ये तिकीट काढूनच प्रवास करावा लागत आहे.
( हेही वाचा : लसवंतांना मिळणार लोकल प्रवास! सरकारची भूमिका )
रेल्वेगाड्या पूर्ववत सुरू
कोरोनाच्या काळात रेल्वेगाड्या बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला होता. त्याच काळात रेल्वेमार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सेवा सुविधाही बंद करून, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी यांच्यासह मासिक पासधारकांना देण्यात येणाऱ्या सुविधाही बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर रेल्वेने सर्व गाड्या पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार सोलापूर विभागातून सध्या ८५ टक्के गाड्या नियमितपणे धावू लागल्या आहेत. मात्र, मासिक पासची सुविधा फक्त ५ ते १० टक्के गाड्यांमध्ये लागू असल्याचे सांगण्यात आले. याचा पासधारकांना मोठा फटका बसत आहे.
Join Our WhatsApp Community