कडक निर्बंधांमध्ये प्रवासी गाड्या चालू राहणार का? रेल्वे मंत्रालयाने दिले उत्तर!

93

देशभर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ही वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याचे आव्हान केंद्र सरकारसमोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सतत चर्चा करत आहेत. अनेक राज्यांनी परराज्यातून येणा-या प्रवाशांनाही प्रवेश देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे प्रवासी रेल्वे सेवा देशात चालू राहणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच आता रेल्वेने ही शंका दूर करत प्रवासी गाड्यांना परवानगी असल्याचे सांगितले आहे.

काय आहे रेल्वे मंत्रालयाचे ट्वीट?

भारतीय रेल्वे मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन ही माहिती दिली आहे. बाहेरगावी जाणा-या प्रवासी गाड्या या आधीप्रमाणेच सुरू राहतील, त्यामुळे प्रवाशांनी घाबरुन जाण्याची किंवा कुठलेही अंदाज बांधण्याची गरज नाही, असे रेल्वे मंत्रालयाने या ट्वीटद्वारे म्हटले आहे. पण त्याचबरोबर या प्रवाशांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. ज्या प्रवाशांकडे आरक्षित किंवा आरएसी तिकीट असेल केवळ त्याच प्रवाशांना हा प्रवास करता येईल. तसेच संपूर्ण प्रवासादरम्यान सोशल डिस्टंन्सिंग आणि इतर नियमांचे पालन केले जाईल, याची खबरदारी घेण्यास रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

(हेही वाचाः सीबीएसई बोर्डाची १०वीची परीक्षा रद्द! )

राज्यांमध्ये कडक निर्बंधांची तयारी

महाराष्ट्रापाठोपाठ इतरही राज्यांनी कोरोनाची स्थिती हाताबाहेर जात असल्याने, आता कडक पाऊले उचलली आहेत. दिल्लीत रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत असल्याचे सांगत, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आठवड्याभराच्या कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच गुजरात, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये लॉकडाऊनच्या पर्यायावर विचार करण्याची गरज असल्याचे न्यायालयांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.