मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर! शिवनेरी, अश्वमेधसाठी MSRTC ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

191

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या ७५ वर्षांवरील प्रवाशांकरता एक आनंदाची बातमी आहे. मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना आता शिवनेरी आणि अश्वमेध या बसगाड्यांतूनही मोफत प्रवास करता येणार आहे. आतापर्यंत केवळ ज्येष्ठांना शिवशाही बसमधून मोफत प्रवास करण्याची सुविधा होती. मात्र वाहतूक विभागाने शिवनेरी आणि अश्वमेध या गाड्यांसाठीदेखील अमृत योजना लागू करण्याचा प्रस्ताव पाठवला, यानंतर एसटी महामंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे.

(हेही वाचा – MSRTC: ‘लालपरी’कडून इतर राज्यांच्या तुलनेत आकारला जातोय दुपटीपेक्षा अधिक प्रवासी कर!)

दरम्यान, वाहतूक विभागाने एसटीच्या शिवनेरी आणि अश्वमेध या बस गाड्यांसाठी अमृत योजना लागू करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. ६५ वर्षांवरील ज्येष्ठांची सवलत या बसेस गाड्यांमध्ये लागू करण्याच्या सूचना केल्या आहेत. या प्रस्तावावर विचार करून एसटी महामंडळाने मान्यता दिली असून यामुळे ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत आणि ६५ वर्षांवरील नागरिकांना सवलतीच्या दरात शिवनेरी आणि अश्वमेधमधून प्रवास करता येणार आहे.

२६ ऑगस्ट रोजी अमृत ज्येष्ठ नागरिक योजेनेचा शुभारंभ झाला. नोव्हेंबर अखेरपर्यंत या योजनेतंर्गत दोन कोटींहून अधिक ज्येष्ठांनी मोफत प्रवास केला आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात साध्या, निमआराम, शयनयान, मिडी, आसन-शयनयान आणि वातानुकूलित या प्रकारातील गाड्या आहेत. वातानुकूलित प्रकारातील केवळ शिवाशाही बसमधूनच ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येत होता. मात्र शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसमधून प्रवास करताना ज्येष्ठांना पूर्ण तिकीटाचे भाडे आकारले जात होते. त्यामुळे ज्येष्ठांमध्ये नाराजी होती. मात्र एसटी महामंडळाने घेतलेल्या या निर्णयानंतर मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या ७५ वर्षांवरील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.