राज्यात कोरोनाचे संकट असून, मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेली लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली. मात्र नोकरी टिकवण्यासाठी आजही अनेक जण मुंबईच्या लोकलमधून खोटे ओळखपत्र बनवून प्रवास करत आहेत. मात्र आत हा प्रवास करणे काहींच्या चांगलेच अंगलट आले असून, मध्य आणि पश्चिम रेल्वेने अशा प्रवाशांवर कारवाई केली आहे.
रेल्वेची अशीही कारवाई!
काही सर्वसामान्य प्रवासी बनावट ओळखपत्र बनवून तिकीट घेऊन लोकल प्रवास करत आहेत. अशा प्रवाशांना पकडण्यासाठी पश्चिम, मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष पथक उभारले आहे. यातून पश्चिम रेल्वे मार्गावरून 1 एप्रिल ते 25 जूनपर्यंत या तीन महिन्यात एकूण 740 केसेस दाखल झाल्या आहेत. 3 लाख 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वेने 1 ते 16 जूनपर्यंत यामध्ये 702 केसेस दाखल झाल्या आहेत. 3 लाख 51 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान रेल्वेकडून करण्यात येणारा दंड भरावा लागला तरी चालेल, पण आम्हाला पोटासाठी हे खोटं करावे लागत, अशी प्रतिक्रिया काही प्रवाशांनी दिली आहे. दरम्यान राज्य सरकारने सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल किती दिवस बंद ठेवणार आहे. कोरोना कायमचा राहिला, तर काय कायमचा लोकल प्रवास बंद केला जाईल का? प्रवाशांचे जगणे कठिण बनून बसले असताना कडक निर्बंधाचे खेळ खेळणे राज्य सरकार, रेल्वे प्रशासनाने थांबविले पाहिजे, अशी प्रतिक्रिया प्रवासी संघटनेकडून देण्यात आली.
(हेही वाचा : मुंबईतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त बालकांमध्ये आढळल्या अँटिबॉडीज)
आधीच नोकऱ्या गेल्यात त्यात हा त्रास!
मागील वर्षीच्या लाॅकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे आता आधीच्या नोकरीपेक्षा कमी पगाराची नोकरी मिळाली आहे. मात्र, लोकल सेवा सुरू नसल्याने आताची नोकरीही जाण्याची भीती आहे. नुकताच सोशल मीडियावर परळ स्थानकातील विना तिकीट पकडलेल्या तरूणांची चित्रफित प्रसारित होत आहे. यामध्ये तरूण दीड वर्ष नोकरी गमाविल्याने घरी बसून होता. तर, नवीन नोकरी लागून दोन दिवस झाले आणि दुसऱ्याच दिवशी विना तिकीट प्रवास करताना तिकीट तपासनीसाने पकडले. त्यामुळे बँकेच्या खात्यात फक्त 400 रूपये असताना पैसे कसे देऊ आणि माझा पुढचा पगार होईपर्यंत कसे जगू ? राज्य सरकारने लोकल सेवा सुरू करावी, असे गाऱ्हाण त्या तरूणाने घातले.
Join Our WhatsApp Community