- प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) बसेसमध्ये सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद टाळण्यासाठी यूपीआय (UPI) पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचा पर्याय प्रवाशांना देण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार हा निर्णय लागू करण्यात आला असून, त्याला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मागील काही दिवसांत यूपीआयद्वारे होणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे, अशी माहिती महामंडळाने दिली.
वाहक-प्रवासी वाद टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय
एसटी (ST) बसमधील तिकीट दर निश्चित असले तरी सुट्ट्या पैशांअभावी वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद निर्माण होण्याचे प्रमाण वाढले होते. प्रवाशांच्या तक्रारी आणि वाहकांना होणाऱ्या त्रासाची परिवहन मंत्री सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली. त्यानंतर प्रत्येक वाहकाकडे इलेक्ट्रॉनिक तिकीट इशू मशीन (ETIM) असल्याने, यूपीआय पेमेंटचा पर्याय अधिकाधिक प्रवाशांनी स्वीकारावा, असे आवाहन करण्यात आले.
यूपीआय व्यवहारात मोठी वाढ
एसटी (ST) महामंडळाने यूपीआय पेमेंटचा अधिकाधिक प्रचार आणि जागरूकता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. परिणामी, गेल्या काही दिवसांत यूपीआयद्वारे तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली असून उत्पन्नही दुपटीने वाढले आहे.
वाहकांना सुट्ट्या पैशांसाठी आग्रधन रक्कम उपलब्ध
तसेच, महामंडळाने वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन रक्कमेमध्ये १०० रुपयांपर्यंत सुट्टे पैसे देण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यातील वाद मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहली या पिढीतील सर्वोत्तम कसोटीपटूंच्या स्पर्धेतून बाहेर?)
महामंडळाचा पुढील दिशानिर्देश
एसटी (ST) महामंडळाने यूपीआय व्यवहारांना अधिक चालना देण्यासाठी अधिक जनजागृती करण्याचा निर्धार केला आहे. भविष्यात वाहक आणि प्रवाशांमध्ये सुट्ट्या पैशांवरून वाद उद्भवू नयेत, यासाठी महामंडळाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
यूपीआय पेमेंट प्रणालीमुळे प्रवाशांना अडचणी टाळता येतील आणि एसटी (ST) महामंडळालाही महसूल वाढवण्यासाठी मदत होईल. त्यामुळे अधिकाधिक प्रवाशांनी या पर्यायाचा स्वीकार करावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community