सध्या मध्य रेल्वेने (Central Railway) कडक स्वच्छता मोहीम राबवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी रेल्वेने आता स्थानकांवर मुंबई महापालिकेच्या धर्तीवर क्लीनअप मार्शल नेमण्याचा निर्णय घेतला आहे. हे क्लीनअप मार्शल रेल्वे स्थानकांत अस्वच्छता करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई करणार आहेत.
मध्य रेल्वेने (Central Railway) लोकमान्य टिळक टर्मिनसयामध्ये तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर क्लीनअप मार्शल नेमले आहेत. हा प्रयॊग जर यशस्वी झाला तर असे क्लीनअप मार्शल इतर उपनगरीय रेल्वे स्थानकांतही नेमण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. सध्या रेल्वे स्थानकांत स्वच्छता ठेवण्यासाठी स्वच्छता कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोणावर होणार कारवाई?
रेल्वे (Central Railway) फलाटांवर कचरा टाकणाऱ्या, रेल्वे स्थानकांवर थुंकणाऱ्या आणि रिकामी पाण्याची बाटली, वेफर्सची आवरणे कचराकुंडीत न टाकता इतरत्र फेकणाऱ्या आणि अस्वच्छता पसरवणाऱ्या बेशिस्त प्रवाशांना दंड होणार आहे.
(हेही वाचा Ashish Shelar : संजय राऊतांच्या टीकेवर आशिष शेलारांचा पलटवार, म्हणाले,’… तर भर चौकात होऊ शकता नागवे’)
किती होणार दंड?
रेल्वे स्थानकात (Central Railway)अस्वच्छता करणाऱ्या प्रवाशांना १०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सुरुवातीला २०० रुपयांच्या दंडाचा प्रस्ताव होता, मात्र चर्चेअंती तो शंभर रुपये करण्यात आला आहे.
मार्शल यांना दंड आकारण्याचा अधिकार नाही
मनुष्यबळांसह मशीनच्या मदतीने स्थानकांत स्वच्छता राखली जाते. मात्र, प्रवाशांची प्रचंड वर्दळ पाहता स्वच्छता राखण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरत आहे. प्रवासी आणि मार्शल यांच्यातील वाद टाळण्यासाठी रेल्वे स्थानकांवरील क्लीन अप मार्शलना दंड आकारण्यापूर्वी पुरावा म्हणून टाइम स्टॅम्पसह स्नॅप घेण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या आहेत. मार्शलला दंड घेण्याचा अधिकार नाही. अस्वच्छता करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकातील तिकीट तपासणीसांकडे घेऊन जावे लागणार आहे. पुराव्याची पडताळणी केल्यानंतर टीसी दंड आकारून त्याची पावती प्रवाशांना देणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community