रुग्णसेवा हाच वैद्यकीय शिक्षणाचा, व्यवसायाचा केंद्रबिंदू! सुरेश काकाणी यांचे मत

मुंबई महानगरपालिकेच्‍या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहाव्या स्थापनादिनी संवाद साधताना ते बोलत होते.

124

आपण करीत असलेली रुग्णसेवा अत्युच्च पातळीवर नेण्यासाठी आणि आपल्या रुग्णालयाची व वैद्यकीय महाविद्यालयाची अधिक चांगली ओळख निर्माण होण्यासाठी रुग्णसेवा हाच आपल्या कामाचा व व्यवसायाचा केंद्रबिंदू आहे, हे आपण सदैव लक्षात ठेवून अधिकाधिक समर्पित भावनेने रुग्णसेवा करायला हवी. रुग्ण सेवेसोबतच वैद्यकीय संशोधनाकडे देखील जाणीवपूर्वक लक्ष देऊन संशोधकीय दृष्टीकोन विकसित करायला हवा, ज्यामुळे रुग्णांना परिणामकारक औषधोपचार मिळू शकतील. तसेच संशोधकीय दृष्टीकोन विकसित करण्यासाठी सातत्याने ग्रंथालयांचा व ऑनलाईन वाचनालयांचा अधिकाधिक वापर देखील करायला हवा, असे मार्गदर्शन अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी केले.

(हेही वाचा : कोरोना ओसरल्याबरोबर आशा वर्कर्स वाऱ्यावर! सरकारचे मतलबी धोरण! )

मुंबई महानगरपालिकेच्‍या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहाव्या स्थापनादिनी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्‍ट्र राज्‍याच्या कोविड प्रतिबंधविषयक कृती समितीचे अध्‍यक्ष डॉ. संजय ओक हे प्रमुख अतिथी म्हणून, तर उपायुक्‍त (सार्वजनिक आरोग्‍य) देविदास क्षीरसागर, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्‍णालये) डॉ. रमेश भारमल आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता शैलेष मोहिते हे विशेषत्वाने उपस्थित होते. याप्रसंगी या मान्यवरांची देखील समयोचित भाषणे झाली.

उल्लेखनीय कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांचे कौतुक!

या कार्यक्रमाला केईएम रुग्‍णालयाचे अधिष्‍ठाता डॉ. हेमंत देशमुख, शीव रुग्‍णालयाचे अधिष्‍ठाता डॉ. मोहन जोशी, नायर दंत महाविद्यालयाच्या अधिष्‍ठाता डॉ. निलम अंद्रादे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, माजी अधिष्‍ठाता डॉ. चर्तुवेदी व डॉ. पिनाकिन गुज्‍जर, प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खातेप्रमुख (माध्‍यमिक आरोग्‍य सेवा) डॉ. प्रदीप जाधव यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान गेल्या शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांचे मान्यवरांचे हस्ते प्रशस्तीपत्रे देऊन कौतुक करण्यात आले. या कौतुक सोहळ्यामध्ये प्रामुख्याने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध शैक्षणिक, सह-शैक्षणिक, कला, क्रीडा इत्यादी स्पर्धांमध्ये वा कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवून उल्लेखनीय कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. त्याचबरोबर गेल्या शैक्षणिक वर्षादरम्यान उल्लेखनीय कामगिरी करणा-या अध्यापक शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमा दरम्यान करण्यात आला. कोविडच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम साधेपणाने आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहिते यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.