…तर हैदराबाद येथील गरजू रुग्णाला ठाण्यातील रुग्णाकडून फुफ्फुस मिळाले असते

167

मुंबईत अवयवदानाच्या चळवळीला गती येत असताना अचानक ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात अवयवदानासाठी पुढाकार घेतलेल्या अवयवदात्याबाबत विचित्र घटना घडली. कुटुंबीयांनी घरातील मुख्य सदस्य गमावल्यानंतर अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यासाठी हृदय, यकृत आणि फुफ्फुस देण्यासाठी कुटुंबीयांनी सहमती दर्शवली. अवयव प्रत्यारोपणासाठी हैदराबाद येथील रुग्णाला तातडीने फुफ्फुसाची गरज होती. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हैदराबाद येथून डॉक्टरांची टीम रुग्णाकडून फुफ्फुस घ्यायलाही पोहोचली. तेवढ्यातच शेवटच्या क्षणाला अवयवदात्याला न्यूमोनियाचे निदान झाले. न्यूमोनिया आजाराची माहिती मिळताच अवयवदान प्रक्रिया तातडीने रोखली गेली अन् हैदराबाद येथील डॉक्टरांची टीम फुफ्फुस न घेताच परतली.

( हेही वाचा : पारा पुन्हा घसरला; ‘या’ शहरांत किमान तापमान १२.५ अंशावर)

ऐन दिवाळीच्या दिवसांत ५० वर्षीय व्यक्ती घरातच बेडवर चक्कर येऊन पडले. हा प्रकार त्यांच्या पत्नी आणि मुलाने पाहिला. आपल्या वडिलांना बेडवर कोसळताना पाहून मुलाने तातडीने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तपासाअंती त्यांना पक्षाघाताचे निदान झाले. आठवडाभर उपचारानंतर रुग्णाच्या मेंदूला अतिरक्तस्त्राव झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी रुग्णांच्या कुटुंबीयांना दिली. आपले वडील आता जगू शकत नाही, ही कल्पना येताच रुग्णाच्या मुलाने आईसह अवयवदानाविषयी चर्चा केली. अवयवदानामुळे इतर गरजू रुग्णांना नवी संजीवनी देता येईल, अशी इच्छा कुटुंबीयांनी डॉक्टरांकडे व्यक्त केली.

रुग्णालयांत अवयवदानाची प्रक्रिया उपलब्ध नसल्याने कुटुंबीयांनी नजीकच्या ज्युपिटर रुग्णालयात रुग्णाला दाखल केले. अवयवदानासाठी हृदय, फुफ्फुस आणि यकृत या तीन अवयवांचे दान करण्याचे ठरले. त्यासाठी गरजू रुग्णांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियांची यादी आणि समन्वयकांशी बोलणेही सुरु झाले. त्यातच हैदराबाद येथील रुग्णाला तातडीने नव्या फुफ्फुसाची गरज असल्याने तेथील डॉक्टर थेट ज्युपिटर रुग्णालयात पोहोचलेही. मात्र अखेरच्या क्षणांत रुग्णाला न्यूमोनियाचे निदान झाल्याने अवयवदान तातडीने थांबवावे लागले. परिणामी, ३६ वी अवयवदान प्रक्रिया अखेरच्या क्षणी थांबल्याने अवयवदानाच्या चळवळीला ब्रेक लागला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.