जंबो कोविड सेंटरमधील रुग्णांना इतर रुग्णालयांत हलवणार

वादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

140

गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाच्या अनुषंगाने केलेल्या पूर्वतयारीचा अनुभव लक्षात घेऊन, तौकते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा उपाय म्हणून वांद्रे-कुर्ला संकुल व दहिसर येथील जंबो कोविड सेंटरमधील अतीदक्षता विभागातील रुग्णांसह ३९५ रुग्णांचे स्थानांतरण हे महापालिकेच्या व राज्य शासनाच्या रुग्णालयांमध्ये करण्यात येणार आहे. हे स्थानांतरण प्रामुख्याने महापालिकेच्या अखत्यारितील सेव्हन हिल्स रुग्णालय, नेस्को जंबो कोविड सेंटर, लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालय आणि राज्य शासनाच्या अखत्यारितील सेंट जॉर्ज रुग्णालय येथे करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

कोविड केंद्रांची विशेष काळजी

अरबी समुद्रात ‘तौकते’ नावाचे चक्रीवादळ तयार होत असून, हे चक्रीवादळ दिनांक १५ व १६ मे २०२१ रोजी मुंबईच्या जवळ येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर कोविड केंद्रांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करत विशेष लक्ष दिले जात आहेत.

(हेही वाचाः सावधान! २ दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस!)

केंद्रांलगतच्या ३८४ झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी

कोविडबाधित रुग्णांना अधिक प्रभावी औषधोपचार मिळावेत, या उद्देशाने मुंबई महापालिकेद्वारे विविध ठिकाणी जंबो कोविड सेंटर उभारण्यात आली आहेत. या जंबो कोविड सेंटरच्या परिसरालगत असणा-या धोकादायक वृक्षांची छाटणी महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे करण्यात आली आहे. यानुसार भायखळा व मुलुंड परिसरातील रिचर्डसन् आणि क्रुडास, एन.एस.सी.आय. डोम, एम.एम.आर.डी.ए., बीकेसी जंबो, नेस्को जंबो कोविड सेंटर, दहिसर जकात नाका, कांदरपाडा, शीव, मालाड, कांजुरमार्ग इत्यादी ठिकाणी असणा-या जंबो कोविड केंद्रांलगतच्या ३८४ झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील इतर ठिकाणी असणा-या धोकादायक झाडांची छाटणी देखील करण्यात येत आहे. वेगाने वारे वाहिल्यास त्या दरम्यान झाडे किंवा फांद्या पडण्याची शक्यता असते, ही बाब लक्षात घेऊन आवश्यक ते मनुष्यबळ साधनसामुग्रीसह व वाहनांसह उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.