मुंबई महापालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील रुग्णांना अखेर मांसाहारी जेवणाचा लाभ मिळणार आहे. मागील काही वर्षांपासून या रुग्णालयामधील रुग्णांना शाकाहारी जेवणच मिळत होते, परंतु या रुग्णांच्या आहारात प्रोटीन्सची अधिक गरज असल्याने त्यांच्या आहारामध्ये अंडी तरी उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी करूनही रुग्णांना केवळ शाकाहारी जेवणच दिले जात असताना आता मात्र या रुग्णांना मांसाहारी जेवण देण्यात येत आहे. महापालिकेने या रुग्णालयातील रुग्णांना आहार पुरवण्यासाठी संस्थेची नेमणूक केली असून या संस्थेच्या माध्यमातून आठवड्यात दोन वेळा मांसाहारी जेवण दिले जाणार आहे.
महापालिकेचे शिवडी येथे १२०० खाटांचे क्षयरोग रुग्णालय असून मुंबईसह राज्यातून क्षयरोगाच्या शेवटच्या अवस्थेत व गुंतागुंतीचे आजार असलेले रुग्ण याठिकणी दाखल होत असतात. या रुग्णालयातील बहादुरजी ब्लॉक हा २६ नोव्हेंबर २०१३पासून एमडीआर व एक्सडीआर रुग्णासाठी सुरु करण्यात आला. या रुग्णालयात क्षय रुग्णांसाठी विनामुल्य उपचाराची सेवा दिली जाते. काही वर्षांपूर्वी इस्कॉन आणि अन्नामृत फाऊंडेशनच्यावतीने या रुग्णालयात सकाळचा नाश्ता आणि दुपार व रात्रीचे जेवण पुरवण्यासाठी निवड केली होती. या संस्थेच्या माध्यमातून या रुग्णांना शाकाहारी जेवणाचा पुरवठा केला जात होता. त्यानंतर फेब्रुवारी २०२०पासून सत्कार कॅटरर्स यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी जेवण पुरवण्यासाठी निवड करण्यात आली होते. हे कंत्राट मार्च २०२३मध्ये संपुष्टात आल्यानंतरही निविदा लांबणीवर पडल्याने त्यांना मे २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
परंतु या रुग्णालयातील रुग्णांना जेवण पुरवण्यासाठी आजवर शाकाहारी जेवणाचा पुरवठा होत असला तरी यापुढे रुग्णांना मांसाहारी जेवणाचा पुरवठा करण्यासाठी निविदा मागवली होती. त्यामुळे अन्नामृत फाऊंडेशनने बाहेरचा रस्ता धरला आणि तसेच क्रिस्टल गौमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि पार्क व्ह्यू हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी बाद झाल्या. त्यामुळे पुन्हा एकदा सत्कार कॅटरर्स या कंपनीची निवड करण्यात आली असून क्षयरोग आंतररुग्णांना उच्च प्रथिनेयुक्त शाकाहारी जेवण सकाळ व संध्याकाळ दोन्ही वेळेत देण्याचे अंतर्भुत केले आहे. रुग्णांच्या आवश्यकतेनुसार मांसाहारी रुग्णांसाठी दोनदा मांसाहारी आहार, शाकाहारी रुग्णांसाठी अतिरिक्त उच्च प्रथिनेयुक्त शाकाहारी आहार दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात व रुग्णांच्या उपचारांच्या आवश्यकतेनुसार मऊ मसालेविरहित आणि द्रव आहाराचा सामावेश केला जाणार आहे.
या मांसाहारी जेवणाच्या पुरवठ्यामध्ये प्रति दिन प्रति रुग्ण ४५ ते ५० एवढा दर वाढला आहे. या रुग्णालयातील ७५० रुग्णांसाठी हा आहार पुरवण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असून प्रत्येक रुग्णासाठी प्रत्येक दिवशी १५६ रुपये खर्च केले जाणार आहेत. या पूर्वी शाकाहारी जेवणामध्ये १३० रुपयांचा खर्च येत होता. त्यामुळे प्रत्येक दिवशीचा प्रत्येक रुग्णांवर २६ रुपयांचा खर्च वाढला गेला आहे. या जेवणाचा पुरवठा करण्यासाठी तीन वर्षांसाठी १२ कोटी ८१ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
(हेही वाचा – मंत्रालयातून रात्री पावणेदोनच्या सुमारास निघाले बदल्यांचे आदेश; मॅटने दिली तात्काळ स्थगिती)
दुपारचे जेवण –
चार चपाती, एक वाटी भात, दोन वाटी डाळ, एक वाटी उसळ, एक भाजी, एक वाटी कोशिंबीर, एक वाटी दही किंवा ताक, लिंबू तुकडा (मांसाहारी जेवणाकरता एक वाटी चिकन रस्सा) (शाकाहारी रुग्णांसाठी पनीर तथा सोया तुकडा रस्सा एक वाटी)
रात्रीचे जेवण –
चार चपाती, एक वाटी भात, दोन वाटी डाळ, एक वाटी उसळ, एक भाजी, एक वाटी कोशिंबीर, एक वाटी दही किंवा ताक, लिंबू तुकडा.
हिरव्या पाले भाज्या आठवड्यातून तीनदा देण्यात येणार असून सर्व रुग्णांसाठी दिवसा उसळ देण्यात येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community