- ऋजुता लुकतुके
पेटीएम पेमेंट्स बँकेवर सध्या रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादलेले असले तरी हळू हळू ही बँक या धक्क्यातून सावरेल. आणि पेमेंट्स बँक पुन्हा आपले नियमित व्यवहार सुरू करू शकेल, अशी आशा पेटीएम पेमेंट्स बँकेचे संस्थापक विजय शेखर बाळगून आहेत. आणि गुंतवणूकदार तसंच ग्राहकांनाही त्यांनी तसा विश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. विजय शेखर सध्या जपानची राजधानी टोकयोत एका वित्तविषयक परिषदेत सहभागी झाले आहेत. आणि तिथे त्यांनी पेटीएमशी संबंधित प्रश्नांना मोकळी उत्तरं दिली. (Paytm Crisis)
(हेही वाचा – Sandeshkhali Case : सर्वोच्च न्यायालयाने ममता सरकारची याचिका फेटाळली; पुन्हा उच्च न्यायालयात पाठवले)
या कारणामुळे कंपनीवर ओढावली ही वेळ
‘तुमचा सल्लागार किंवा कंपनीतील एखादा कर्मचारी तुमच्यासाठी नेहमीच योग्य निर्णय घेतील असं नाही. निर्णय घेताना तुम्ही तुमची बुद्धी आणि विचार पणाला लावले पाहिजेत,’ असं विजय शेखर याविषयी बोलताना म्हणाले. थोडक्यात, काही ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून दिशाभूल झाल्यामुळेच कंपनीवर ही वेळ ओढवल्याचं विजय शेखर यांना वाटतंय. (Paytm Crisis)
गेल्याच महिन्यात त्यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. कंपनीतील इतर गुंतवणूकदारांनी एकत्र येत तशी मागणीच केली होती. आणि आता पेमेंट्स बँकेचं गाडं पुन्हा रुळावर यावं यासाठी ते प्रयत्नशील आहेत. रिझर्व्ह बँकेचे सगळे नियम पाळू आणि त्याबरहुकूम कंपनीच्या कामकाजाच्या पद्धतीत बदल करू असं त्यांनी पूर्वीच सांगितलं आहे. (Paytm Crisis)
(हेही वाचा – GST Department : जीएसटी विभागातील अपिल अधिकारी, उपायुक्त ब.रा. झगरे यांचा भोंगळ कारभार उघड)
कंपनीवर आहे हा आरोप
आता ते नवीन गुंतवणूकदार आणि पेमेंट्स बँकेवरचे निर्बंध कसे कमी करतील, याचा प्रयत्न करत आहेत. ‘आशिया खंडात फिनटेक क्षेत्रात संयुक्त नेतृत्व उभं करण्याची क्षमता आहे. त्यासाठी सगळे एकत्र आले पाहिजेत,’ असं म्हणतानाच शर्मा म्हणाले की, ‘पेटीएम पेमेंट्स बँकेला त्यांना आशियातील सर्वोत्तम कंपनी बनवायचं आहे.’ (Paytm Crisis)
रिझर्व्ह बँकेनं पेटीएम कंपनीची एक उपकंपनी पेटीएम पेमेंट्स बँकेवर फेब्रुवारी महिन्यात कठोर निर्बंध लागू केले. १५ मार्चपासून पेमेंट्स बँकेला नवीन ठेवी, मुदतठेवी किंवा वॉलेट आणि फास्टटॅग खात्यांमध्ये नवीन रक्कम स्वीकारता येणार नाहीए. पेमेंट्स बँकेनं रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं पालन आणि बँकिंग व्यवहारांसाठी दिलेल्या परवान्यातील अटी मोडल्याचा ठपका रिझर्व्ह बँकेनं पेटीएमवर ठेवला आहे. शिवाय ग्राहकांकडून केवायसी ओळखपत्र घेतानाही चालढकल केल्याचा आरोप कंपनीवर आहे. (Paytm Crisis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community