- ऋजुता लुकतुके
पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध आणल्यावर पेटीएमच्या भवितव्याविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. युपीआय ॲपबद्दल रिझर्व्ह बँकेची तक्रार नाही. पण, पेटीएम बँकेवर ३१ फेब्रुवारीनंतर लोकांना व्यवहार करता येणार नाहीएत. त्यामुळे पेटीएममध्ये गुंतवणूक असलेल्या लोकांबरोबरच कंपनीचे कर्मचारीही चिंतेत आहेत. अशावेळी संस्थापक विजय शेखर यांनी रविवारी एक टाऊन हॉल परिषद घेऊन कर्मचाऱ्यांना धीर देण्याचा आणि पुढील दिशा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. (Paytm Crisis)
विजय शेखर शर्मा यांनी ऑनलाईन पद्धतीने ही बैठक घेतली. आणि त्यांच्याबरोबर कंपनीचे मुख्य ऑपरेटिंग अधिकारी भावेश गुप्ता तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी सुरिंदर चावलाही होते. ‘आपल्याला अनेक बँका मदत करू इच्छितात. त्यामुळे घाबरुन जाण्याची गरज नाही. आपण सगळे पेटीएम कुटुंबाचा भाग आहोत. आणि राहणार आहोत,’ असं विजय शेखर शर्मा कर्मचाऱ्यांना म्हणाले. (Paytm Crisis)
पेटीएमचे ८०० ते ९०० कर्मचारी या बैठकीला हजर होते. ‘नेमकं काय चुकलं, रिझर्व्ह बँकेला कशावर शंका येतेय, त्यांचे आक्षेप काय आहेत, हेच अजून आम्हाला ठाऊक नाहीए. पण, त्यांच्याशी चर्चा करुन जे आवश्यक असेल ते आम्ही करु. आणि सगळं सुरळीत करण्याचा प्रयत्न करु,’ असं शर्मा यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं. (Paytm Crisis)
(हेही वाचा – Ind vs Eng 2nd Test : दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर १०६ धावांनी मात, मालिकेत बरोबरी)
या बँकांनी पेटीएम बरोबर सहकार्य करार करण्याची दाखवली तयारी
पेटीएम कंपनीचे पी-टू-पी व्यवहारही पेटीएम पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून होतात. त्यामुळे नवीन व्यवहारांसाठी बंदी असलेल्या पेमेंट्स बँकेऐवजी पेटीएमला इतर बँकांची मदत घ्यावी लागत आहे. पेटीएम ही फिनटेक कंपनी आहे. आणि त्यांची अनेक उत्पादनं आणि सेवा पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून दिल्या जातात. (Paytm Crisis)
त्यामुळे रिझर्व्ह बँकेबरोबर चर्चा करण्याबरोबरच पेटीएम कंपनीला बँकिंग व्यवहारांसाठी इतर बँकांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी इतर बँकांबरोबरची बोलणीही सध्या सुरू आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँकेनंही पेटीएम बरोबर सहकार्य करार करण्याची तयारी दाखवल्याचं विजय शेखर यांनी बोलून दाखवलं आहे. दरम्यान, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन ट्रेडर्सनी व्यापाऱ्यांना पेटीएम पेमेंट्स बँकेचा वापर करण्यापासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Paytm Crisis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community