कोरोना महामारीदरम्यान, कित्येक लोकांनी ई-कॉमर्स कंपन्यांमधून वस्तू खरेदी केल्या. धक्कादायक म्हणजे या ई कॉमर्स कंपन्या ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचे समोर आले आहे. मानकांशिवाय प्रेशर कुकरची विक्री केल्यामुळे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) पेटीएम मॉल आणि स्नॅपडीलला प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच विकलेला माल मागे घ्यावा आणि ग्राहकांना पैसे परत करण्याचे आदेश सीसीपीएने दिले आहेत.
( हेही वाचा : प्रवाशांसाठी खुशखबर! रेल्वे सोडणार १८२ उन्हाळी विशेष गाड्या )
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) दिले आदेश
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दोन वेगळ्या ऑर्डरमध्ये पेटीएम मॉल आणि स्नॅपडील या ईकॉमर्स कंपन्यांना दोषी ठरवले आहे. हे प्रेशर कुकर भारतीय मानक ब्युरो मानकांनुसार नाहीत आणि डोमेस्टिक प्रेशर कुकर ऑर्डर २०२० चे पालन करत नसल्याचे आढळून आले आहे. यामुळेच या कंपन्याना सीसीपीएने प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सीसीपीएने आपल्या आदेशात, पेटीएम मॉलला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर विकल्या गेलेल्या ३९ प्रेशर कुकरची माहिती सर्व ग्राहकांना देण्यास सांगितले असून विकलेला माल मागे घ्यावा आणि ग्राहकांना पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी, सीसीपीएने अनिवार्य मानकांचे उल्लंघन करून उत्पादित करण्यात आलेल्या हेल्मेट, प्रेशर कुकर आणि स्वयंपाकाचा गॅस यासारख्या वस्तू खरेदी करू नयेत, म्हणून ग्राहकांसाठी 6 जानेवारी 2021 रोजी देखील सुरक्षा सूचना जारी केली होती.
Join Our WhatsApp Community