पेन्शनधारकांना दरवर्षी हयातीचे प्रमाणपत्र देणे दिव्य असते. अनेक जण अंथरुणाला खिळून असतात, अनेक जणांना घराबाहेर जाणे शक्य होत नाही. अशा वेळी हे प्रमाणपत्र सादर करणे त्यांच्यासाठी कठीण होते. यातून स्टेट बँक ऑफ इंडियाने स्तुत्य असा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये पेन्शनधारकांना घर बसल्या हयातीचा दाखला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
व्हिडिओद्वारे द्या दाखला!
निवृत्तीनंतर पेन्शनधारकांना काही ठराविक कालावधीनंतर त्यांच्या हयात असल्याचा दाखला देणे बंधनकारक आहे, पेन्शन थांबू नये म्हणून कोणत्याही परिस्थितीत हा दाखल द्यावा लागतो. मात्र यासाठी पेन्शनधारकांना होणाऱ्या कष्टप्राय वेदना कमी केल्या आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने १ नोव्हेंबर २०२१ पासून पेन्शनधारकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. या अंतर्गत बँकेतील पेन्शन खातेधारक घरबसल्या व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकणार आहेत. एसबीआयने या नवीन सुविधेला व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट सर्विस असे नाव दिले आहे.
(हेही वाचा : बापरे! केंद्राने रद्दीतून केली ४० कोटींची कमाई!)
अत्यंत सोपी पद्धत
व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट सेवा ही एक सोपी आणि सुरक्षित पेपरलेस आणि मोफत सुविधा आहे. यामध्ये निवृत्तीवेतनधारकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि पॅन कार्ड आवश्यक असेल. यासाठी निवृत्ती वेतनधारकांना अधिकृत वेबसाईट https://www.pensionseva.sbi/ ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर ड्रॉप डाऊनमधून ‘Video LC’ निवडल्यानंतर तुमचा एसबीआय पेन्शन खाते क्रमांक टाकावा लागेल. यानंतर, पेन्शनधारकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी सबमिट करावा लागेल. नियम आणि अटी स्वीकारा आणि ‘Start Journey’ वर क्लिक करा.
अशी आहे पद्धत!
- व्हिडिओ कॉल दरम्यान पॅन कार्ड तयार ठेवल्यानंतर, ‘I Am ready’ वर क्लिक करा.
- व्हिडिओ कॉल सुरू करण्यासाठी, कॅमेरा, मायक्रोफोन आणि लोकेशन संबंधित परमिशन द्या.
- एसबीआयचा एखादा अधिकारी व्हिडिओ कॉलवर येईल.
- तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या सोयीनुसार वेळेवर व्हिडिओ कॉल शेड्यूल करू शकता.
- व्हिडिओ कॉल सुरू झाल्यावर, पेन्शनधारकाला वेरिफिकेशन कोड मिळेल. तो एसबीआय अधिकाऱ्याला सांगा.
- व्हिडिओ कॉलवर तुमचे पॅन कार्ड दाखवा. एसबीआयचे अधिकारी कॅप्चर करतील.
- एसबीआय अधिकारी पेन्शनधारकाचा फोटोही काढतील. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल.