लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ११ हजार ४९२ लाभार्थ्यांना लस!

२६ जिल्ह्यांत एकूण १३२ लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आले होते.

77

राज्यात १ मे पासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणाला सुरुवात झाली. त्यासाठी २६ जिल्हयांत ठराविक ठिकाणी एकूण १३२ लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण ११ हजार ४९२ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले. सद्यस्थितीत उत्पादकाकडे उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार राज्याने या वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लसीचे ३ लाख डोसेस खरेदी केले आहेत.

(हेही वाचा : शाळांना सुट्ट्या जाहीर, पुढील शैक्षणिक वर्ष १४ जूनपासून!)

मुंबईत ९९२ व्यक्तींचे लसीकरण!

मुंबईतील उपलब्ध लशींचा साठा संपुष्टात आल्याने २९ एप्रिल रोजी महापालिका प्रशासनाने पुढील तीन दिवस संपूर्ण लसीकरण केंद्रे बंद राहणार असल्याचे जाहीर केले. तसेच १ मे २०२१ पासून नियोजित १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण हे पुरेशा लस साठ्याअभावी पुढे ढकलले जाईल, असे प्रशासनाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केले होते. परंतु शुक्रवारी रात्री प्रशासनाने अचानकपणे निर्णय घेत मुबई महापालिकेच्या नायर, कुपर, राजावाडी आणि सेव्हनहिल्स रुग्णालयांसह बीकेसी कोविड सेंटर या पाच ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्याची घोषणा केली. त्यानुसार पहिल्याच शुभारंभाच्या दिवशी पाचही लसीकरण केंद्रांवर ९९२ व्यक्तींचे लसीकरण झाले. तर ४५ वर्षांवरील अधिक वयोगटातील व्यक्तींचे, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईनवरील ५,०३१ व्यक्तींचे लसीकरण पार पडले. त्यामुळे दिवसभरात एकूण ६ जार २३ व्यक्तींचे लसीकरण पार पडले. या ६ हजार २३ व्यक्तींवर झालेल्या या लसीकरणामध्ये ३,३९३ व्यक्तींनी पहिला डोस तर २,६३० व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. मात्र, पुढील तीन दिवस लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले असले तरी दिवसभरात १८ ते ४४ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण वगळता पाच हजार व्यक्तींचे लसीकण पार पाडले.

मुख्यमंत्र्यांनी केलेले हे आवाहन!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी लसीकरण केंद्रांवर विनाकारण गर्दी न करण्याचे आवाहन केले. आपल्याकडे दिवसाला १३ लाख लोकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. परंतु केंद्राकडून मर्यादीत साठा मिळत आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची संख्या सुमारे ६ कोटी इतकी आहे. त्यांच्या लसीकरणासाठी आपल्याला किमान १२ कोटी लसीचे डोस लागतील. कुठल्याही लस उत्पादक कंपनीकडून आपल्याला एवढे डोस उपलब्ध होत असतील. तर आपण एक रकमी पैसे देऊन लसीचा साठा विकत घ्यायला तयार आहोत, सोबतच ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी जास्तीत जास्त लस पुरवण्याची मागणी देखील केली, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.