‘…तर पुढील आषाढीला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पूजेचा मान देऊ’, पंढरपुरातील नागरिकांचा सरकारला इशारा! काय आहे कारण?

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा सांगितल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा चिघळला असताना, आता पंढरपुरातही पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीने आंदोलन सुरू केले आहे. पंढरपुरातील श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात राबवण्यात येणा-या पंढरपूर कॉरिडोअरला विरोध करण्यासाठी पंढरपूर संतभूमी बचाव समितीने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

या कॉरिडोअरची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली नाही तर पुढील आषाढी एकादशीसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्याचा निर्धार आम्ही केल्याची माहिती या समितीचे अध्यक्ष आदित्य फत्तेपुरकर यांनी दिली आहे.

(हेही वाचाः ‘ते एकमेव आहेत ज्यांनी…’, राज्यपालांच्या विधानावर मिसेस फडणवीसांची प्रतिक्रिया)

पंढरपूर कॉरिडोअरला विरोध

पंढरपूर कॉरिडोअरला विरोध करण्यासाठी शुक्रवारी मंदिर परिसरातील स्थानिकांनी आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीने मंदिराच्या पश्चिम दरवाज्याजवळ ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. यामध्ये राजकीय मंडळी आणि विविध समित्यांचे अध्यक्षदेखील सहभागी झाले आहेत. हा कॉरिडोअर रद्द करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत असून, उपोषण देखील करण्यात येत आहे.

कॉरिडोअरला विरोध का?

पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणा-या भाविकांच्या सुविधेसाठी श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात सरकारकडून एक कॉरिडोअर उभारण्यात येणार आहे. या कॉरिडोअरच्या उभारणीसाठी मंदिर परिसरातील स्थानिकांची घरे आणि दुकाने पाडण्यात येणार आहेत. त्यामुळे याला विरोध करण्यासाठी म्हणून हे उपोषण सुरू आहे. तसेच कॉरिडोअर रद्द न झाल्यास पंढरपुरातील भाजपचे सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामा देणार असल्याचे भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी सांगितले आहे.

(हेही वाचाः राज्यातील इतक्या उद्योगांनी गुंडाळला गाशा, काय आहे कारण?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here