लसीकरणाच्या नियोजन अभावी जनता त्रस्त!

लसीकरणामध्ये जनतेचे होणारे हाल लक्षात घेता, तसेच गर्दीविना कशाप्रकारे लसीकरण करता येईल याचे नियोजन करूनच प्रशासनाने लसीकरण केंद्र सुरु करावीत, अशा प्रतिक्रिया जनतेमधून उमटत आहेत.

149

मुंबई महापालिका लसीकरणावरुन पुरती उघडी पडली आहे. मुंबई महापालिकेकडे लससाठा उपलब्ध नसतानाच १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरु केले आहे. तर दुसरीकडे महापालिकेसह शासकीय लसीकरण केंद्रांवरच फक्त दुसऱ्याच डोसचे लसीकरण होणार, असे जाहीर करून प्रत्यक्षात पहिल्या डोसचे लसीकरण केले जात आहे. त्यामुळे महापालिकेचे नियोजन पुरते फसलेले असून खुद्द आयुक्तच गोंधळलेले असल्याने त्यांचे अधिकारीही गोंधळात गोंधळ घालून लोकांच्या शिव्यांची लाखोली सहन करू लागले आहेत.

महापालिकेचा संदेश पोहोचलाच नाही!

मुंबई महापालिकेच्यावतीने मागील काही दिवसांमध्ये लससाठा नाही म्हणून लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची घोषणा केली जाते. तर त्याच रात्री लससाठा उपलब्ध झाल्यानंतर उशिराच पुन्हा लसीकरण केंद्र सुरु ठेवण्याचे आदेश देत दुपारी बारा नंतर पुन्हा हे केंद्र सुरु केले जाते. असे प्रकार मागील काही दिवसांपासून सुरु आहेत. त्याच शनिवार ते मंगळवारपर्यंत लससाठा नसल्याने चार दिवस खासगी लसीरकरण केंद्र बंद आहेत. तर बुधवारी काही केंद्र दुपारी बारा नंतर सुरु करण्यात आली आहे. पण नागरीकांना हे निरोपच रात्री उशिरा देण्यात आल्याने, ते त्या लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही. त्यामुळे लोकांनी सकाळी सात वाजल्यापासून केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली. पण बारा वाजले तरी अनेक केंद्रांवर लसीकरणास सुरुवात झाली नव्हती. लसीकरण केंद्र बंद असणे, दुसऱ्या मात्रेसाठी लसीकरण असतानाच पहिल्या मात्रेचेही लसीकरण करायचे. कोव्हॅक्सिनचा साठा उपलब्ध करून न देणे, खासगी लसीकरण केंद्र बंद ठेवणे या सर्व बाबींमुळे महापालिका प्रशासन पुरते उघडे पडले आहे.

(हेही वाचा : हिंदमाताला तुंबले, तर केंद्र सरकारच जबाबदार!)

४५ वयोगटातील व्यक्तींचीही कुचेष्ठा केली!

मुंबईत ४५ वर्षांपुढील लोकांचे लसीकरण हे ५० टक्केही पूर्ण झालेले नाही. त्या वयोगटातील व्यक्तींना पहिलाही डोस दिला जात नाही, असे असताना १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लसीकरण सुरु करून एकप्रकारे महापालिकेने ४५ वयोगटातील व्यक्तींचीही कुचेष्ठा केलीच आहे. आज लसीकरणाची गरज ही ४५ वर्षांवरील व्यक्तींना असून लससाठा पूर्ण क्षमतेने मिळत नाही, तोवर १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाची मोहीम महापालिकेने हाती घ्यायला नको होती. पण आज ना धड ४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण होते ना ४४ वर्षांखालील व्यक्तींचे. त्यामुळे लसीकरणाच्याा नियोजनाचा बोऱ्या वाजल्यामुळे याचा सर्वाधिक त्रास जनतेला होत आहे. त्यामुळे लसीकरणामध्ये जनतेचे होणारे हाल लक्षात घेता तसेच गर्दीविना कशाप्रकारे लसीकरण करता येईल याचे नियोजन करूनच प्रशासनाने लसीकरण केंद्र सुरु करावीत,नअशा प्रतिक्रिया जनतेमधून उमटत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.