अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात पोहोचवले, तर केंद्र सरकार देणार पैसे! अशी आहे योजना

केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने या योजनेची घोषणा केली आहे.

121

रस्त्यावरील भीषण अपघातात जखमी झालेल्यांना वेळेत मदत न मिळाल्यामुळे अनेकदा आपले प्राण गमवावे लागतात. अशा अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी आता केंद्र सरकारने एका नव्या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला एका तासाच्या आत रुग्णालयात पोहोचवणा-यांना बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्यात येणार आहे.

काय आहे योजना?

अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला एका तासाच्या आत रुग्णालयात पोहोचवून त्याचे प्राण वाचवण्यास मदत करणा-या व्यक्तीला 5 हजार रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेसंदर्भात केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाकडून सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून सूचना देण्यात आल्या आहेत. 15 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत या योजनेचा कालावधी असेल असे सांगण्यात आले आहे.

(हेही वाचाः गडकरी म्हणाले, आम्हाला विदर्भाची लाज वाटते!)

हा आहे योजनेमागचा हेतू

या योजनेबाबत माहिती देण्यासाठी मंत्रालयाने सोमवारी नियमावली जारी केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत रस्त्यावरील अपघातग्रस्तांना प्रामाणिकपणे मदत करणा-या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच रस्ते अपघातांमुळे होणा-या मृत्यूंचे प्रमाण कमी करणे हा सुद्धा या योजनेमागचा हेतू आहे.

हा पुरस्कार सुद्धा मिळणार

रोख बक्षिसासोबतच मदत करणा-या व्यक्तीला एक प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे. तसेच या पुरस्काराव्यतिरिक्त राष्ट्रीय स्तरावर सर्वात प्रामाणिकपणे मदत करणा-या 10 नागरिकांना एक-एक लाख रुपयांचा पुरस्कार देखील देण्यात येणार असल्याचे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

(हेही वाचाः यासाठीच ‘मी सर्व मंत्र्यांचे लाल दिवे काढून घेतले!’ गडकरींनी सांगितले कारण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.