मास्क लावण्याबाबतच्या जनजागृतीसाठी लोकप्रतिनिधीही उतरले रस्त्यावर!

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग वाढून बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच लोकप्रतिनिधी जनजागृती करत आहेत.   

मुंबईतील वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येमुळे आता लोकप्रतिनिधीही रस्त्यावर उतरून नागरिकांना तसेच फेरीवाल्यांना मास्क लावण्याचे आवाहन करत आहे. विनामास्कच्या नागरिकांसह दुकानदार व फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे त्यांना प्रेमाने आणि आपुलकीने समजावण्यासाठी लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले असून काही प्रमाणात आपल्या लोकप्रतिनिधींचा मान राखत मास्क लावण्याच्या प्रकारात वाढ दिसून येत आहे. दंडाची भीती असली तरी आजाराचे महत्व पटवून दिल्यानंतर फेरीवाल्यांसह नागरिकही मास्क वापरु लागले आहेत. त्यामुळे दंडात्मक कारवाईबरोबरच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होणाऱ्या जनजागृतीचा चांगला परिणाम दिसून येवू लागला आहे.

आमदार यामिनी जाधव यांनी रस्त्यावर फिरुन करतात जागृती 

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग वाढून बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना शिस्त लागावी म्हणून विनामास्कच्या लोकांवर  दोनशे रुपयांचा दंड आकारण्याचे अधिकार क्लीन अप मार्शल यांना दिले आहे. तरीही फेरीवाले तसेच नागरिकांकडून मास्कचा वापर केला जात नाही. त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यासाठी लोकप्रतिनिधी रस्त्यांवर उतरले आहे. काही दिवसांपूर्वी भायखळा येथील आमदार यामिनी जाधव यांनी रस्त्यावर फिरुन मास्क न लावणाऱ्यांना हटकून त्यांना मास्क लावण्यास भाग पाडले. तसेच मास्क नसलेल्यांना मास्कही उपलब्ध करून दिले.

नगरसेविका अनुराधा पोतदार करतात जनजागृती 

तर गिरगावमधील भाजप नगरसेविका अनुराधा पोतदार यांनी मागील काही महिन्यांपासून विभागातील फेरीवाल्यांना स्वत: शिस्त लावण्यास सुरुवात केली आहे. फेरीवाल्यांसह रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हटकून त्यांना मास्क लावण्यास प्रवृत्त करत आहेत. मात्र, आपली ही आता नेहमीची सवय झाली असून आता मला लांबून पाहिले, तर फेरीवाले तसेच दुकानदार मास्क व्यवस्थित करतात किंवा लावलेले नसल्यास तोंडावर लावतात, असे पोतदार सांगतात.

(हेही वाचा : पी- उत्तर विभागाला सहायक आयुक्त मिळेना! सर्वाधिक लोकसंख्या असलेला विभाग वाऱ्यावर!)

महापौर किशोरी पेडणेकर यांनीही केलेले प्रबोधन 

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भायखळा स्थानकाबाहेर फिरुन फेरीवाल्यांना तसेच स्टॉल्सधारकांना मास्क लावण्याचे आवाहन केले होते. तसेच काही  लोकप्रतिनिधी व्हॉट्सअप व फेसबूकच्या माध्यमातून  पोस्टद्वारे नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here