Mhada : म्हाडावरील लोकांचा विश्वास वाढतोय, आता म्हाडाला अधिक गतीमान होण्याची गरज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

131

सर्वसामान्यांना स्वत:चे घर घेण्याचे बळ म्हाडा देत असून या वर्षभरात चार वेळा लॉटरी काढली गेली आहे. यातून म्हाडावरील लोकांचा वाढलेला विश्वास दिसून येत असून यासाठी म्हाडाला आता अधिक गतीमान होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मुंबई मंडळाच्यावतीने काढण्यात आलेल्या घरांच्या लॉटरी सोडतीतील कार्यक्रमात सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांची ऑनलाईन लॉटरी सोडत रिमोटद्वारे बटन दाबत काढण्यात आली. यावेळी बोलतांना शिंदे यांनी घर घेणे हे प्रत्येक नागरिकांचे स्वप्न असते आणि तो आपले स्वत:चे घर घेण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी माणूस पुंजी गोळा करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या उमेदीच्या काळात घेण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे हे घर घेण्याचे बळ म्हाडा त्यांना देत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या एका वर्षांत चार वेळा लॉटरी सोडत काढली गेली. त्यामुळे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सांगितले की एका सदनिकांमध्ये जी ३० जणांची स्पर्धा आहे, ते प्रमाण कमी करण्यासाठी म्हाडाला गतीमान व्हावे लागेल. म्हाडावरील लोकांचा विश्वास वाढत आहे. आजच्या लॉटरीत ज्यांना घर लागणार नाही त्यांनी खजिल होऊ नये. त्यांच्यासाठी आणखी एक लॉटरी लवकरच काढली जाणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा I.N.D.I.A च्या महाराष्ट्रातील बैठकीआधीच ठाकरे गटाने टाकला मिठाचा खडा; भलताच प्रस्ताव मांडून नव्या वादाला सुरुवात)

हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे म्हाडाला आता गती वाढवावी लागेल. यातील काही उणीवा आहे त्या दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मागील अडीच वर्षात कधीही लॉटरी निघाली नाही, पण आमचे सरकार आल्यानंतर आम्ही पूर्ण क्षमतेने काम करत आहोत. पूर्वी काही प्रकल्प रखडले होते. आज अनेक प्रकल्प रखडले आहेत. कुणाला भाडे मिळत नाही, तर कुणी मुंबई बाहेर फेकले जात आहेत. काही जण यावर राजकारण करतात. निवडणूक आले की ते राजकारण करत असतात. परंतु आम्हाला त्याचे राजकारण करायचे नसून आम्ही गिरणी कामगार आणि सर्वसामान्यांना म्हाडाचे घर कसे चांगले मिळेल यासाठी प्रयत्न करायचा आहे,असे त्यांनी सांगितले.

आम्ही आल्यावर धारावी विकासप्रकल्प हाती घेतला. पूर्वी बाहेरील लोक झोपडपट्टी पहायला यायचे आणि या झोपडपट्टीचा विकास केलेला पहायला येतील. या माध्यमातून झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांचे जीवनमान सुधारण्याचा सरकार प्रयत्न करत आहे,असे ते म्हणाले. सरकारी काम आणि सहा महिने थांब अशाप्रकारची जी काही म्हण होती ती आता बदलत चालली असून सरकारी कामेही जलदगतीने होत आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या मोहिमेद्वारे सरकारमधील अधिकारी जनतेच्या द्वारी जात काम करत आहेत. त्यामुळे जनतेला आता मंत्रालय किंवा सरकार दरबारी हेलफाटे मारायची गरज भासत नाही. आतापर्यंत दीड कोटी जनतेची कामे आपण केल्याचे त्यांनी सांगितले.

पंढरपूरचा विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्याची गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची इच्छा मान्य करत पंढरपूरचा विकास म्हाडाच्या माध्यमातून केला जावा. पण पंढरपूरात हा प्रकल्प राबवताना प्रेमाने करायचा आहे,अशाही सूचना त्यांनी केल्या. सर्वांचे घर असावे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून या घरांच्या निर्मितीत महाराष्ट्रात अव्वल राहावे यासाठीच सरकारचा प्रयत्नशील असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.