कोरोना काळात अनेक बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेगाड्या बंद होत्या. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर आता मध्य रेल्वेवर ९५ टक्क्यांहून अधिक मेल-एक्सप्रेस गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. प्रवाशांचा हळूहळू प्रतिसाद वाढत असतानाच मध्य रेल्वेने राज्याच्या ‘गरीबरथ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस आणि मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस कायमस्वरुपी बंद केल्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
( हेही वाचा : आता ग्रामीण भागातील प्रत्येक योजनेवर ‘असा’ असणार वाॅच! )
प्रवाशांचे हाल
प्रवाशांना पूर्वसूचना न देता या दोन महत्वाच्या गाड्या मध्य रेल्वेने बंद केल्या यामुळे नागरिकांनी असंतोष व्यक्त केला आहे. या दोन्ही गाड्या १७ डब्यांच्या आहेत. यामुळे आता मध्य रेल्वेने आता प्रवाशांच्या सुविधेसाठी जालना जनशताब्दी एक्स्प्रेसचे सहा ते सात डबे वाढवले आहेत. या महत्वाच्या रेल्वे बंद झाल्याने गर्दी वाढत असून सामान्य प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
तोट्यात धावणाऱ्या मेल-एक्सप्रेस रद्द
रेल्वे प्रशासनाने ‘झीरो बेस्ड टाइमटेबल’ची अंमलबजावणी सुरू केली असून कमी प्रतिसादाच्या गाड्या बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. देशात ‘झीरो बेस्ड टाइमटेबल’ लागू करण्यात आले आहे. त्यामुळेच विशिष्ट हंगाम वगळता अन्यवेळी तोट्यात धावणाऱ्या सर्व मेल-एक्सप्रेस रद्द करण्यात येत आहेत.
Join Our WhatsApp Community