मुंबईतील पदपथ हे पादचाऱ्यांसाठी चालण्याकरता असले तरी याठिकाणी व्यावसाय करणारे फेरीवाले दिवसासह रात्रीही आपली पथारी पसरून जागा अडवूनच ठेवत असल्याने नक्की जनतेने चालायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. दादरमधील राजा बढे चौक सिंग्नलपासून ते सिटीलाईट सिनेमा सिग्नल तसेच तिथून पुढे माटुंगा रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या टी. एच. कटारिया मार्गावर ज्याप्रकारे फेरीवाले आपल्या व्यावसायाचे साहित्य त्याचठिकाणी बांधून ठेवत असल्याने या पदपथांवर एकप्रकारे फेरीवाल्यांकडून मालकी दाखवली जात असल्याची बाब समोर आली आहे. मात्र, महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांचे हात ओले होत असल्याने त्यांचा याठिकाणच्या बांधून ठेवल्या जाणाऱ्या सामानांकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचा : बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाची मुख्यमंत्री शिंदे घेतात अधिक काळजी…)
‘पदपथ कुणाचे’ या मथळ्याखाली ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या माध्यमातून फेरीवाल्यांनी कायमस्वरुपी अडवून ठेवलेल्या पदपथांचा मागोवा घेतला जात आहे. पहिल्या टप्प्यात दादर पश्चिम भागातील सर्व रस्त्यांचा मागो घेतल्यानंतर आता दादर-माटुंगा भागातील रस्त्यांच्या पदपथांचा आढावा घेतला आहे. यामध्ये राजा बढे चौकपासून लेडी जमशेटजी मार्गावरील मनमाला टँक रोड ते टी एच कटारिया मार्ग सिग्नलपर्यंत मोठ्याप्रमाणात पदपथांवर फेरीवाले व्यवसाय करत आहेत. या मार्गावर व्यावसाय करणारे फेरीवाले रात्री आपले साहित्य तिथेच बांधून ठेवत आहेत. शिवाय ज्यादिवशी व्यवसाय करायचे नाही तेव्हाही ते बांधूनच ठेवत आहेत. या संपूर्ण पदपथावर प्रत्येक फेरीवाल्यांनी जागा अडवून ठेवल्या असून प्रत्येक जण जणू काही आपली मालकीच असल्याप्रमाणे याठिकाणी व्यावसायाचे साहित्य बांधून ठेवले जात आहे.
तसेच सिटीलाईट सिग्नल ते माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानकापर्यंतच्या रस्त्यावरील पदपथाची एक बाजु अशाचप्रकारे फेरीवाल्यांन अडवून ठेवले आहेत. थोटे दुध पासून समाधान हॉटेलपर्यंत आणि पुढे अजय शॉपिंग पासून ते संदेश हॉटेलपर्यंतच्या परिसरात फेरीवाले आपले साहित्य तिथेच बांधून ठेवत पदपथ अडवून ठेवत आहेत. टी एच कटारिया मार्ग हा फेरीवाला क्षेत्र म्हणून आधीच घोषित करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणच्या पदपथांची सुधारणा ही फेरीवाल्यांनी व्यावसायाचे साहित्य न हटवल्याने योग्यप्रकारे करता आलेली नाही. त्यामुळे या पदपथाचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाले असून खुद्द स्थानिक नगरसेविका असलेल्या तत्कालिन सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनीही या पदपथाची सुधारणा चांगल्याप्रकारे व्हावी यासाठी कंत्राटदाराला धारेवर धरले नाही. त्यामुळे दीड वर्षांपूर्वी बनवलेल्या पदपथांची अवस्था दयनीय झाल्याचे पहायला मिळत आहे.
Join Our WhatsApp Community