देशात सातत्याने होणारी इंधन दरवाढ सर्वसामांन्यांच्या खिशातील धन मात्र हिरावून घेत आहे. पेट्रोलने केव्हाच दरांची शतकपूर्ती केली असून, आता डिझेलनेही शतकी खेळी केली आहे. डिझेलच्या या नव्या किंमतींनी आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक गाठला आहे. मुंबईत डिझेलचे दर हे आता 99.55 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
अशा आहेत नव्या किंमती
मुंबईत गुरुवारी पेट्रोलच्या किंमती 29 पैशांनी वाढून 109.25 रुपये, तर डिझेलच्या किंमती 38 पैशांनी वाढून 99.55 म्हणजेच 100 रुपयांच्या आसपास पोहोचल्या आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोल 30 पैशांनी वाढून 103.24 रुपये लिटर झाले. तर डिझेल 35 पैशांनी वाढून 91.77 रुपये लिटर झाले आहे.
(हेही वाचाः रेल्वेच्या इतिहासातील पहिला उभा सागरी पूल कुठे होणार? काय आहे वैशिष्ट्य)
…म्हणून इंधन दरवाढीचे संकट
पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या चार दिवसांपासून सातत्याने वाढत असून, गेल्या आठ दिवसांत डिझेल 2.53 तर गेल्या 5 दिवसांत पेट्रोल 1.50 रुपयांनी महागले आहे. त्यामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे भारतावर हे इंधन दरवाढीचे संकट ओढवले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती या 80 डॉलर प्रति बॅलरपर्यंत पोहोचल्या आहेत. या किंमती भविष्यात आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गॅस सिलेंडरही पुन्हा भडकले
घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 15 रुपयांनी वाढल्यामुळे आता मुंबईतील 14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 926 रुपये झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती या सातत्याने वाढत आहेत. जुलै महिन्यापासून आतापर्यंत त्यात 90 रुपयांनी वाढ झाली आहे.
(हेही वाचाः आता गॅस सिलेंडर पुन्हा महागले! इतक्या रुपयांनी वाढले दर)
Join Our WhatsApp Community