घाटकोपर येथे होर्डिंग पडून अनेक नागरिकांचा जीव गेला. या घटनेनंतर पुणे महापालिकेनेही शहरातील होर्डिंगवर कारवाई करण्याचा आदेश दिला. त्यानुसार, कारवाई सुरू झाली; पण होर्डिंग व्यावसायिकांनी त्यास विरोध केल्याने कारवाई थंडावली आहे. चुकीच्या पद्धतीने होर्डिंग उभे केल्याने नागरिकांच्या जिवाला धोका कायम असल्याने त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने गुरुवारी आकाशचिन्ह विभाग व क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पुणे शहरातील प्रत्येक अधिकृत होर्डिंगचा फोटो आणि त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आकाशचिन्ह निरीक्षकांनी केलेली बनवाबनवी उघड होणार असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. (PUNE)
पुणे शहरात महापालिकेने परवानगी दिलेले २ हजार ५९८ होर्डिंग आहेत; पण चौकाचौकांत, रस्त्यावर एकाच इमारतीवर अनेक होर्डिंग उभे आहेत. अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झालेले असले; तरी महापालिकेची परवानगी असल्याचे सांगून त्यावर कारवाई केली जात नाही. याची आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दखल घेऊन नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने कारवाईसाठी पाऊल उचलले आहे. (PUNE)
(हेही वाचा – Eknath Shinde: उद्धव ठाकरे यांनी आता नवीन ज्योतिषी शोधावा, शिवसेना आमदारांच्या पक्षांतराच्या दाव्यावर शिंदेंचा पलटवार)
निरीक्षकावर थेट निलंबनाची कारवाई
१५ क्षेत्रीय कार्यालयांच्या आकाशचिन्ह निरीक्षकांनी त्यांच्या हद्दीतील प्रत्येक होर्डिंगचा फोटो काढून, लेखी अहवाल सादर करायचा आहे. त्यामध्ये २०२२च्या नियमावलीतील कोणत्या तरतुदींचे उल्लंघन केले आहे. त्याचे स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. यामध्ये चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास आकाशचिन्ह निरीक्षकावर थेट निलंबनाची कारवाई केली जाणार आहे तसेच धोकादायक होर्डिंग पडून जीवितहानी झाल्यास थेट सेवेतून बडतर्फ केले जाईल, अशा इशारा आयुक्त भोसले यांनी बैठकीत दिला.
होर्डींग उभे करण्यासाठी झाडांच्या फांद्या तोडणाऱ्यांवरही कारवाई
नियमांचे उल्लंघन करून होर्डिंग उभी आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी काही कर्मचाऱ्यांना शहराच्या विविध भागांतील होर्डिंगचे फोटो काढून आणण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांनी सुमारे १५० फोटो काढले, त्यातील अनेक होर्डिंग नियमबाह्यपणे उभे असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता सर्व २ हजार ५९८ होर्डिंगचे फोटो काढून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. होर्डिंग उभे करण्यासाठी झाडांच्या फांद्या तोडणाऱ्यांवरही कारवाई होईल, असे पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community