छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशी छेडछाड, भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षावर कारवाईची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशी छेडछाड करत त्याजागी टिपू सुलतानचा चेहरा लावून छायाचित्र ट्विट करणाऱ्या भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.वी. यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भाजपा गटनेता प्रभाकर शिंदे, आमदार मिहीर कोटेचा, पक्षनेता विनोद मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली भाजपा नगरसेवकांनी आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भूषण बेळणेकर यांच्याकडे केली.

घृणास्पद कृत्याचा भाजप कडून तीव्र निषेध

तमाम भारतीयांचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ फोटोशी छेडछाड करून त्याजागी क्रूरकर्मा टिपू सुलतानचा चेहरा लावून ते छायाचित्र भारतीय युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.वी. याने स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट केले. त्याचे हे कृत्य छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे आणि तमाम हिंदूंच्या भावना दुखावणारे असून यातून काँग्रेसच्या हिणकस प्रवृत्तीचे दर्शन होते. या घृणास्पद कृत्याचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे अशी तीव्र प्रतिक्रिया गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.

त्वरित कारवाई करावी करण्याची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता असून संपूर्ण विश्वात त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. श्रीनिवास यांनी शिवरायांच्या फोटोशी छेडछाड करून तमाम हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या टिपूचा फोटो लावणे ही घटना अतिशय गंभीर असून यातून हिंदू द्वेषाची स्पष्टता होते. वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान भारतीय जनता पक्ष कदापि सहन करणार नाही. याबद्दल तातडीने पोलिस प्रशासनाने श्रीनिवास यांच्यावर गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई करावी अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने सडेतोड उत्तर देण्यात येईल असा इशारा आमदार मिहीर कोटेचा यांनी दिला. यावेळी नगरसेवक कमलेश यादव, अभिजित सामंत,भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here