पिंपरी-चिंचवड हादरले… 48 तासांत झाले चार खून

या हत्यांच्या घटनेमुळे शहरातील पोलिस प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

197

पिंपरी-चिंचवड शहर खरोखरच भयमुक्त आहे का, हा प्रश्न विचारावा लागेल. कारण अवघ्या 48 तासांत चार खून झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे. सोमवारी निगडी, तळेगाव आणि हिंजवडी येथे तीन खुनांच्या घटना घडल्या, त्यानंतर चिखली कॅम्पसमध्ये मंगळवारी सकाळी पुन्हा एका व्यक्तीच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. या हत्यांच्या घटनेमुळे शहरातील पोलिस प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

एकामागोमाग एक घटना

विरेंद्र वसंत उमरगी नावाच्या व्यक्तीचा मृतदेह चिखली कॉम्प्लेक्सच्या नेवाळे वस्तीतील गणेश सिद्धी पार्कमध्ये सापडला आहे. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या व्यक्तीची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, सोमवारी 24 तासांत तीन हत्या झाल्या. ओटास्कीम निगडीमध्ये एका तरुणाच्या हत्येची घटना घडली, संपत गायकवाड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

(हेही वाचाः भयानक! बेपत्ता आई आणि मुलाच्या वहीत सापडले असे काही, ज्यामुळे…)

आधी बलात्कार मग हत्या

यानंतर, एका दिराने आपल्या मित्राच्या सोबतीने आपल्याच वहिनीवर देव पाहण्याच्या बहाण्याने डोंगरावर नेऊन सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. सोमवारी सकाळी पिंपरी-चिंचवडला लागून असलेल्या मावळ तालुक्यात घोराडेश्वरच्या डोंगराच्या झुडपात एका महिलेचा मृतदेह आढळल्याने दहशत निर्माण झाली. ओढणीने गळा आवळल्यानंतर, डोक्यावर दगडाने मारहाण करुन महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. मिताली सोमनाथ तडस असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मितालीचा दिर तुकाराम कौंडीबा तडस याला अटक केली आहे. तर आरोपी अक्षय कारंडे अजूनही फरार आहे.

कायदा-सुव्यवस्थेचा खेळखंडोबा

सोमवारी संध्याकाळी हिंजवडी सूस परिसरात एका व्यक्तीची हत्या झाल्याचे समोर आले. या हत्येनंतर हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. तीन हत्यांच्या घटनेनंतर मंगळवारी झालेल्या चौथ्या खुनाच्या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश कदाचित झीरो टॉलरन्सची बाब विसरले असतील, त्यामुळेच शहरात दिवसेंदिवस खुनाच्या घटना वाढत आहेत. आता पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश या शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी कोणती पाऊले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचाः राज्यात महिला सुरक्षित? गेल्या काही दिवसांत घडल्या ‘इतक्या’ बलात्काराच्या घटना)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.