प्लास्टिक बाटल्या द्या! मोफत चहा आणि वडापाव मिळवा, वाचा…

77

सरकारने प्लास्टिक वापरावर निर्बंध आणले आहेत. तरीही काही लोक सर्रास प्लास्टिकचा वापर करतात. यावर उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) एक अभिनव उपक्रम राबवत आहे. महापालिकेने नियुक्त हॉटेल व्यावसायिक आणि विक्रेत्यांना रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या देणाऱ्यांना एक कप चहा आणि वडापाव मोफत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ही योजना या महिन्यापासून लागू होणार आहे.

काय आहे उपक्रम?

पिंपरी-चिंचवड शहरातील कोणताही सामान्य नागरिक किंवा कचरा वेचणाऱ्याने ५ रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्या नियुक्त हॉटेल किंवा विक्रेत्याकडे सोपवल्यास एक कप चहा मिळेल आणि जे १० रिकाम्या बाटल्या देतील त्यांना वडापाव मिळेल हा अनोखा उपक्रम महापालिका राबवणार आहे. रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्या असलेल्या नागरिकांना जवळच्या पालिकेने नियुक्त केलेल्या हॉटेल किंवा विक्रेत्याशी संपर्क साधावा लागेल. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाने प्रकल्पात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यावसायिकांकडून अर्ज मागवले आहेत. त्यांना मासिक आधारावर पालिका रकमेची परतफेड करेल. व्यावसायिकांना एक कप चहासाठी 10 रुपये आणि वडापावसाठी 15 रुपये मिळतील.

(हेही वाचा : गतवर्षापेक्षा 2021 मध्ये ‘या’ कारणानं रेल्वे अपघातांत सर्वाधिक मृत्यू! )

शहर प्लास्टिकमुक्त करणे हा या योजनेचा उद्देश आहे. पिंपरी-चिंचवड शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्या विकत घेणारे कोणीही नाहीत ‘किमान एका बिअरच्या बाटलीला 1 रुपया तरी मिळेल, पण प्लास्टिकच्या बाटल्यांसाठी कोणीही खरेदीदार नाहीत’, असे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाचे आरोग्य प्रमुख डॉ. अनिल रॉय यांनी स्पष्ट केले आहे.

प्लॅस्टिकच्या बाटल्यांमुळे केवळ पर्यावरणालाच धोका निर्माण होत नाही, तर नाले, कालवे आणि इतर जलकुंभांनाही धोका निर्माण होतो. ‘दररोज, प्लास्टिक कचरा निर्माण होतो, परंतु या कचऱ्याची विल्हेवाट ही एक मोठी समस्या आहे. या उपक्रमाद्वारे, आम्ही शहरातील प्लास्टिकचा धोका कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत’, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

वडापावावर प्रश्नचिन्ह

काही नागरी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, वडापावाऐवजी, पीसीएमसीने आरोग्यदायी नाश्ता द्यावा. रस्त्याच्या कडेला असलेले काही विक्रेते आणि लहान हॉटेलवाले वडे हे भेसळयुक्त तेलात तळून काढतात. हे सामान्य माणसांच्या आरोग्यासाठी विशेषत: हृदयासाठी घातक आहे, असे वकील सुशील मंचरकर म्हणाले.

पीसीएमसीने मात्र हॉटेलवाले आणि विक्रेत्यांकडे फूड लायसन्स आहे की नाही, याची पडताळणी केली जाईल, असे सांगितले. ‘जर हॉटेलवाल्यांकडे फूड लायसन्स असेल तर त्यांनी हेल्दी फूड सर्व्ह करण्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. याशिवाय, आमची टीम नियमितपणे अशा हॉटेल्समधील स्वच्छता आणि स्वच्छतेच्या परिस्थितीची तपासणी करेल’, असे डॉ. रॉय यांनी स्पष्ट केले. रिकाम्या बाटल्या गोळा केल्यानंतर, पीसीएमसी त्या मोशी कचरा डेपोत घेऊन जाईल. प्लास्टिकच्या बाटल्यांचे इंधनात रूपांतर केले जाईल. ‘आमचा मोशी येथे एक प्लांट आहे जिथे आम्ही प्लास्टिकचे औद्योगिक तेलात रूपांतर करतो’, असेही डॉ. रॉय यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.