पदवीधर तरुण झाले गुन्हेगार… पोलिसांनी केली कारवाई

पोलिसांनी 1 करोड 20 लाख 20 हजार रुपयांच्या एकूण 16 चारचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांची बारीक नजर आहे. दिवस रात्र शहरात गस्ती घालणारे पोलिस गुन्हेगारांना गजाआड करत आहेत. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या गुन्हेगारांमध्ये उच्च शिक्षित तरुणांचा समावेश आहे. त्यामुळे ज्या हातात पदव्या आहेत, त्याच हातांमध्ये आता बेड्या पडल्या आहेत. दोनदा केलेल्या छापेमारीत पोलिसांनी अशा 6 तरुणांवर कारवाई केली आहे.

1 करोडच्या 16 गाड्या जप्त

चिंचवड पोलिसांनी अशा सहा उच्चशिक्षित आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी लोकांना पैशाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत असत. लोकांकडून गाड्या भाड्याने घेऊन त्या इतरांना विकण्याचा एक बेकायदेशीर व्यवसायच त्यांनी सुरू केला होता. या आरोपींकडून पोलिसांनी 1 करोड 20 लाख 20 हजार रुपयांच्या एकूण 16 चारचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.

अशी करत होते फसवणूक

कल्पेश पंगेरकर आणि नमन सहानी हे दोन मुख्य आरोपी आपल्या इतर साथीदारांसह हे काम करत होते. ज्यांना पैशांची अत्यंत गरज आहे अशा लोकांकडून त्यांच्याकडे असलेली गाडी भाड्याने घेऊन त्या बदल्यात त्यांना पैसे देण्याची लालूच दाखवत असत. पण त्यांच्याकडील गाडी ताब्यात आल्यानंतर त्यांना पैसे देण्यास नकार देत. तसेच गाडी परत मागितल्यास त्यांना धमकावून गप्प करत असत. हे सर्व तरुण उच्च शिक्षित असून, त्यांच्या हातात चांगल्या पदव्या आहेत. पण पैशांची गरज भागवण्यासाठी त्यांनी हा पैसे कमवायचा सोपा, जलद पण वाकडा मार्ग निवडला. असे पिंपरी-चिंचवड शहराचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here