पुण्यात पोलिसांकडून अनेक ठिकाणी नाकाबंदी केली जात असून नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. मात्र हीच कारवाई पोलिसांच्या जीवावर उठली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दुचाकीस्वाराला रोखणे वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. दुचाकीस्वाराने वाहतूक विभागाच्या पोलिस कर्मचाऱ्याला रस्त्यावरून फरफटत नेल्याची घटना घडली आहे.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. संजय एकनाथ शेडगे (वय ४२, रा. आढाले खुर्द, ता. मावळ), असे अटक केलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. शंकर तुकाराम इंगळे (वय ४७), असे दुखापत झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
(हेही वाचा : आता अनिल परबांचा ३०० कोटी बदली घोटाळा?)
काय आहे हे प्रकरण?
एका नाकाबंदी पॉईंटवर हिंजवडी वाहतूक विभागाचे हवालदार शंकर इंगळे ड्युटीवर होते. यावेळी संजय शेडगे नावाची व्यक्ती समोरून आली. पोलिस हवालदार इंगळे यांनी त्या व्यक्तीला थांबवून त्या व्यक्तीकडे वाहन परवाना आणि इतर कागदपत्रांची विचारणा केली. यावेळी परवाना आणि कागदपत्रे दाखवण्याऐवजी आरोपी शेडगे याने इंगळे यांच्यासोबत हुज्जत घालायला सुरुवात केली. इंगळे यांना धक्का देऊन दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाल्यानंतर सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Join Our WhatsApp Community