स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष : त्या तीन दिवसांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून ३ हजार वृक्षांचे रोपण

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान राबविण्यात येणाऱया घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा अभियानासाठी मुंबईतील प्रत्येक घरात महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रध्वज तिरंगा फडकवण्याबरोरबच विविध उपक्रम राबवले जाणार आहे. यामध्ये वृक्षारोपणाचीही मोहिम राबवली जाणार आहे. या तीन दिवसांच्या मोहिमेमध्ये तब्बल ३ हजार झाडांचे वृक्षारोपण शालेय विद्यार्थी आणि खासगी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने महापालिका राबवणार आहे.

( हेही वाचा : साताऱ्यात भूस्खलन झालेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी ४ कोटींचा निधी – मुख्यमंत्री)

३ हजार झाडांचे वृक्षारोपण

भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशभरात १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान राबवले जाणार आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर स्वयं स्फूर्तीने राष्ट्रध्वज तिरंगा फडकवावा, यानिमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान आणि योगदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण व्हावे, या हेतूने सदर अभियान राबवले जाणार आहे. स्वातंत्र्य लढ्यातील मुंबईचे मोलाचे योगदान पाहता,मुंबई महानगरपालिकेने स्वतः सर्व मुंबईकरांसाठी राष्ट्रध्वज तिरंगा खरेदी करण्याचा आणि ते घरोघरी पोहोचविण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा जोमाने कार्यरत असून घरोघरी तिरंगा अभियानाच्या यशस्वीतेसाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीही केली जात आहे.

जनजागृतीही केली जाणार

या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त घरोघरी ध्वज फडकवण्याबरोबरच पथनाट्य, तसेच इतर माध्यमातून जनजागृतीही केली जाणार असून उद्यान विभागाच्या माध्यमातून या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये वृक्षारोपण केले जाणार आहे. मुंबईमध्ये या तिन्ही दिवशी ३ हजार वृक्षांचे रोपण केले जाणार असल्याची माहिती उद्यान विभागाचे अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. प्रत्येक दिवशी १ हजार याप्रमाणे ३ हजार वृक्षांचे रोपण केले जाणार आहे. मुंबईती १३७ ठिकाणी ही सर्व झाडे शाळेची मुले आणि खासगी स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने हे वृक्षारोपण केले जाणार आहे. या प्रत्येक वृक्षारोपणाच्या प्रसंगी भारताचा ध्वज फडकवला जाईल,असे उद्यान विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here