कोकणातील संगमेश्वर रेल्वेस्थानकातील फलाटाची दुरवस्था झाली आहे. गेल्या जुलै महिन्यात कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी संगमेश्वर रेल्वस्थानकावरील फलाट क्रमांक २ ची पाहणी केली. फलाट अनेक ठिकाणी खचला असून फलाटाची कडा तुटली आहे. या सर्व गोष्टी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांच्या निदर्शनात आणून देत, त्यांनी दुरुस्तीचे आश्वासन दिले, पण आजतागायत याकडे रेल्वेच्या प्रशासनाने लक्ष दिलेले नाही.
( हेही वाचा : बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन; या आहेत प्रमुख मागण्या )
धोकादायक प्रवास
संगमेश्वर स्थानकावर दिवा-सावंतवाडी पॅसेंजर, मुंबई-मडगाव मांडवी आणि तुतारी एक्स्प्रेस या गाड्या अनेक वेळा फलाट क्रमांक दोनवर थांबतात. गाडी पहिल्या फलाटाऐवजी दुसऱ्या फलाटावर येण्याची उद्घोषणा झाली की, सामानासह फलाट क्रमांक दोनवर जाण्यासाठी प्रवाशांची लगबग सुरू होते. अशावेळी या दुरावस्था झालेल्या फलाटावरून जाणे धोकादायक ठरू शकते. गाडीत चढताना आणि उतरतानाही फलाटाच्या तुटलेल्या भागावर पाय दिला गेला, तर प्रवासी त्यावरून तोल जाऊन रुळावरही पडू शकतो. त्यातून आणखी गंभीर अपघात होऊ शकतो. तसेच फलाटावरील जमीन सुद्धा अनेक ठिकाणी खचली आहे. प्रवाशांसाठी हे अत्यंत धोकादायक आहे.
अपघात झाल्यास कोकण रेल्वे जबाबदारी घेणार का?
याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यानुसार त्यांनी पाहणीही केली. तरी फलाट दुरुस्तीच्या दृष्टीने काहीच हालचाली झालेल्या नाहीत. नादुरुस्त फलाटामुळे अपघात झाला, तर कोकण रेल्वे जबाबदारी घेणार का, असा सवाल निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य ग्रुपचे प्रमुख पत्रकार संदेश जिमन यांनी विचारला आहे. फलाटाची दुरुस्ती तातडीने झाली नाही, तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community