बोरीवली पश्चिम येथील कोरा केंद्राच्या मागील बाजुस असलेल्या मोकळ्या भूखंडावरील सहा झोपड्यांवर आर मध्य महापालिका विभागाच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून हा भूखंड अनधिकृत झोपड्यांनी अडवून ठेवला होता. परंतु काही दिवसांपूर्वी न्यायालयाने या भूखंडावरील स्थगिती उठवल्यानंतर महापालिकेने बुधवारी या झोपड्यांवर कारवाई करत अतिक्रमणांच्या विळख्यातून याची सुटका केली.
बोरीवली पश्चिम येथील कोरा केंद्र यांच्या मागील बाजुस असलेल्या चाचा नेहरु गार्डन शेजारी साईबाबा नगर येथील सुमारे ३०० चौरस मीटरच्या जागेवर उच्च शिक्षण आणि मनोरंजन मैदानाचे आरक्षण आहे. हा भूखंडा १९७८ पासून महापालिकेच्या ताब्यात असून काही समाज कंटकांनी यावर बांबू आणि सिमेंट पत्र्यांचे बांधकाम केले होते. याठिकाणी सहा झोपड्या बांधल्याने याविरोधात महापालिकेने बजावलेल्या नोटीस विरोधात न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळवली होती. त्यामुळे या भूखंडावरील अतिक्रमणांबाबतचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना मागील महिन्यातील सुनावणीमध्ये न्यायालयाने ही स्थगिती उठवली.
(हेही वाचा संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या; १५ सदस्यांची हक्कभंग समिती स्थापन)
त्यामुळे उपायुक्त भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली आर मध्य विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्या चमुने बुधवारी या सहा अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करत हा भूखंड अतिक्रमणातून मुक्त केला. या जागेवर उच्च शिक्षण व मनोरंजन मैदान असे आरक्षण असल्याने या भूखंडावर सुरक्षा भिंत उभारुन या जागेचा ताबा संबंधित विभागाकडे हस्तांतरीत केला जाईल,असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केला.
Join Our WhatsApp Community