कुर्ला पश्चिम येथील जंगलेश्वर महादेव मंदिर मार्ग येथील शीतल नगरमधील महापालिका जलअभियंता विभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले असून या जागेवर डेब्रीजचा राडारोडा टाकला जात असल्याने आता ही जमीन अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. हा राडारोडा हटवून त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यासाठी महापालिकेच्यावतीने सुमारे ६३ लाखांचा खर्च केला जाणार आहे.
महापालिका जलअभियंता विभागाच्या अखत्यारित असलेल्या कुर्ला पश्चिम येथील जागेवर राडारोडा, डेब्रीज, माती तसेच मलबा टाकून भूभागावर अतिक्रमण करून त्या जागेचा गैरवापर केला जात होता. त्यामुळे कुर्ला येथील या जागेवर जलाशयाचे आरक्षण असून या जागेची रेखाचित्र सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे. या आरक्षित भूखंडावरील सध्याचे अतिक्रमण हटवल्यानंतर महापालिकेच्यावतीने याठिकाणी संरक्षक भिंत बांधवण्याचा निर्णय घेतला. आरक्षित भूखंडावरील अतिक्रमण काढून टाकून तो भूखंड अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जागेचे सीमांकन करून या जागेचा वापर करता यावा यासाठी याठिकाणी तारेचे कुंपण बांधण्यात येणार आहे.
यासाठी मागवलेल्या निविदेत विरकृपा कंस्ट्रक्शन कंपनी ही पात्र ठरली असून यासाठी सुमारे ६३ लाख रुपयांचा खर्च होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कुर्ला पश्चिम येथील आणखी एक भूखंड डेब्रीजमुळे जो अतिक्रमित झाला आहे,तो आता डेब्रीजमुक्त करण्यात येणार आहे.
(हेही वाचा हसन मुश्रीफ यांच्या घरावरील ईडीच्या धाडीनंतर समन्स)