मध्य रेल्वेवरील लाखो प्रवाशांना दिलासा देणाऱ्या ठाणे ते दिवा दरम्यानच्या पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी ऑनलाईनद्वारे लोकार्पण केले जाणार आहे. तर ठाण्यात होणाऱ्या कार्यक्रमात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत लोकलला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
मध्य रेल्वेवरील ठाणे-दिवा पाचवा व सहावा मार्ग कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर ३६ अधिक फे-यांबरोबरच प्रवास अधिक वेगवान होणार आहे. तसेच भविष्यात एसी लोकल सेवा सुरू होणार आहे. सध्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे प्रवाशांची होणारी रखडपट्टीही टळत आहे. या महत्वपूर्ण मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता ऑनलाईनद्वारे लोकार्पण केले जाणार आहे.
ठाण्यातही होणार कार्यक्रम
ठाणे रेल्वे स्थानकातही लोकार्पण कार्यक्रम होणार असून, त्याला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत. तर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, भाजपाचे खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची कार्यक्रमाला उपस्थिती असेल.
( हेही वाचा: रेल्वे प्रवाशांची डोकेदुखी कायम! आणखी पाच मेगाब्लाॅक, वाचा सविस्तर)
कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू
ठाणे रेल्वे स्थानकात अनेक वर्षानंतर रेल्वे मंत्र्यांचे आगमन होत आहे. त्यानिमित्ताने रेल्वे प्रशासनाबरोबरच भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून स्वागताची जोरदार तयारी करण्यात येत आहे. प्लॅटफॉर्म क्र. १ लगत भव्य शामियाना उभारला जात आहे.
रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा अपेक्षित
ठाणे रेल्वे स्थानक हे ऐतिहासिक आहे. भाजपाचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या प्रयत्नानंतर मोदी सरकारने ठाणे रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणाला परवानगी दिली होती. त्यानंतर रेल्वे स्थानकातील जुनी इमारत तोडून सुशोभिकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. आता रेल्वेमंत्र्यांच्या ठाणे दौऱ्याच्या निमित्ताने ठाणे रेल्वे स्थानकाच्या विकासाबाबत महत्वपूर्ण घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
Join Our WhatsApp Community