अयोध्येतील महर्षी वाल्मिकी विमानतळाचे उद्घाटन शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यादरम्यान विविध विकासकामांच्या प्रकल्प हाती घेण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये नवीन लोकल गाड्या, रेल्वे स्थानकांचा सुधारित विस्तार यासह इतर अनेक विकासकामांचा समावेश आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशातील सर्व भाविकांना आवाहन केले आहे.
देशातील सर्व भाविकांना आणि भगवान श्री रामाच्या भक्तांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ जानेवारीला अयोध्येत न येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी भाविकांना प्रभु श्री रामाला त्रास होईल, असे कोणतेही वर्तन भक्तांनी करू नये, असे म्हटले आहे.
(हेही वाचा – PM Narendra Modi : अयोध्या दौऱ्यावर असताना PM Narendra Modi म्हणाले, अयोध्या धामच्या विकासकामांचा अभिमान)
पंतप्रधानांनी हात जोडून सर्व भक्तांना विनंती केली आहे की, २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात येण्याचा निर्णय घेऊ नका. आधी कार्यक्रम होऊ द्या आणि २३ जानेवारीनंतर तुम्ही कधीही येऊ शकता. प्रत्येकाला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा आहे, परंतु सुरक्षेच्या कारणांमुळे सर्वांना सामावून घेणे शक्य नाही. तुम्ही ५५० वर्षांहून अधिक काळ वाट पाहिली आहे. आणखी काही काळ थांबा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
घरीच दिवा लावून सोहळा साजरा करण्याचे आवाहन…
तसेच २२ जानेवारीला प्रभु श्री राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या दिवशी आपल्या घरी दिवे लावा. जेणेकरून संपूर्ण भारतात दिवाळी साजरी केल्याप्रमाणे वातावरण निर्मिती होईल, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. या भव्य कार्यक्रमाची तयारी वर्षानुवर्षे सुरू असून त्यात कोणताही व्यत्यय येऊ नये, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. “येथे गर्दी करू नका कारण मंदिर कुठेही जात नाही; ते शतकानुशतके तिथे असेल. श्री रामाचे दर्शन घेण्याकरिता जानेवारी, फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये किंवा पुढच्या वर्षी कधीही येऊ शकता, पण २२ जानेवारीला येऊ नका. भाविकांमुळे मंदिर व्यवस्थापनाला कोणतीही अडचण येऊ नये, असे पंतप्रधान म्हणाले.
मंदिर स्वच्छतेची मोहिम हाती घ्यावी…
त्याचप्रमाणे लाखो पर्यटकांना सामावून घेण्यासाठी अयोध्येतील नागरिकांना तयार राहावे लागेल तसेच देशातील सर्वात स्वच्छ शहर बनवण्यासाठी अयोध्येतील जनतेला शपथ घ्यावी लागेल, असेही ते पुढे म्हणाले. यावेळी १४ जानेवारीपासून ८ दिवस स्वच्छता मोहीम हाती घेण्याची घोषणाही त्यांनी केली. श्री राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याआधी ही मोहीम हाती घेण्याचे कारण म्हणजे भगवान श्री राम संपूर्ण देशाचे आहेत. आता ते येत आहेत, त्यामुळे कोणतेही मंदिर कितीही लहान किंवा मोठे असले तरीही अस्वच्छ राहू नये. याकरिता भारतातील सर्व मंदिर व्यवस्थापन समित्यांनी मंदिर स्वच्छेतेची मोहीम मकर संक्रांतीपासून राबवावी, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.
हेही पहा –