कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायींवर निर्बंध घातले होते. मात्र आता कोरोना बऱ्यापैकी निवळला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी महापरिनिर्वाण दिनी आंबेडकरी जनतेला चैत्यभूमीत येता येणार आहे. त्यावेळी अनुयायांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने केंद्र सरकारने हा कार्यक्रम आखला आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाचा आदेश
महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. त्यांची निवासाची सोय दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथे केली जाते. गेल्या वर्षी कोरोनामुळे महापरिनिर्वाण दिनावरही निर्बंधांचे सावट होते. मात्र यंदा निर्बंध नसल्याने दरवर्षी प्रमाणेच मोठ्या संख्येने अनुयायी अभिवादनासाठी येण्याची शक्यता आहे. यंदाचे वर्ष हे स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जमलेल्या अनुयायांशी संवाद साधणार आहेत. त्याकरता शिवाजी पार्क येथे नियोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने राज्य सरकारला कळवले आहे. राज्याने पालिकेच्या विभाग कार्यालयाला त्याबाबत कळवले आहे. महाराष्ट्रात नागपूर, पुणे, रत्नागिरी, मुंबई अशा चार ठिकाणी महापरिनिर्वाण दिन आणि अमृत महोत्सव असा एकत्रित कार्यक्रम होणार आहे.
(हेही वाचा रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा १० रुपये)
Join Our WhatsApp Community