आता नागरिकांना मिळणार हेल्थ कार्ड! काय आहेत फायदे? वाचा

देशातील प्रत्येक घटकापर्यंत उत्तम आरोग्यविषयक सुविधा पुरवणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

167

लसीकरणाचा वेग वाढवून भारत कोरोनाशी यशस्वी झुंज देत आहे. आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्याचदृष्टीने आता आयुष्मान भारत डिजीटल मिशनचा शुभारंभ सोमवारी करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी आपल्या लाल किल्ल्यावरील भाषणात या मिशनच्या पायलट प्रोजेक्टची घोषणा केली होती. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाद्वारे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या तिस-या वर्धापन दिनानिमित्त या मिशनचा राष्ट्रीय स्तरावर प्रारंभ करण्यात येणार आहे. याद्वारे नागरिकांना युनिक हेल्थ कार्ड पुरवण्यात येणार आहे.

काय आहे योजना?

आरोग्य क्षेत्राला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे डिजिटल इंडिया योजनेंतर्गत राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान सुरू करण्यात आले आहे. देशातील प्रत्येक घटकापर्यंत उत्तम आरोग्यविषयक सुविधा पुरवणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. त्यसाठी युनिक हेल्थ कार्डची ऑनलाईन सुविधा नागरिकांना पुरवण्यात येणार आहे.

असा होणार फायदा?

प्रत्येक व्यक्तीचा वैद्यकीय रेकॉर्ड युनिक हेल्थ आयडीमार्फत एका डेटाबेसच्या माध्यमातून स्टो्र करण्यात येणार आहे. या आयडीचा वापर करुन प्रत्येक व्यक्तीची आरोग्यविषयक माहिती मिळवणे सहज शक्य होणार आहे. उपचारादरम्यान हा आयडी दाखवल्यानंतर डॉक्टरांना त्या व्यक्तीला असलेले आजार व करण्यात आलेले उपचार यांची संपूर्ण माहिती मिळू शकते. त्याचप्रमाणे रुग्णाची आर्थिक स्थिती काय आहे याचीही माहिती सरकारला या डेटाबेसच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याआधारे सरकारला अनुदानाचा लाभ देण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करण्यास मदत होणार आहे.

कसे असेल हेल्थ कार्ड?

आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक यांच्या आधारे व्यक्तीला एक युनिक आरोग्य कार्ड देण्यात येईल. त्यावर आरोग्य आयडीचा समावेश असेल. प्रत्येक व्यक्तीची आरोग्यविषयक माहिती गोळा करण्यासाठी सरकार एक आरोग्य प्राधिकरण तयार करेल. सार्वजनिक रुग्णालय, सामुदायिक आरोग्य केंद्र, आरोग्य आणि निरोगी केंद्र किंवा राष्ट्रीय आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर रजिस्ट्रीशी संलग्न असलेले आरोग्य सेवा प्रदाता व्यक्तीचे आरोग्य आयडी तयार करू शकतात. तसेच https://healthid.ndhm.gov.in/register येथे तुमच्या स्वतःच्या नोंदी नोंदवून तुम्ही देखील तुमचा हेल्थ आयडी तयार करू शकता.

मोदींनी दिली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्वीट करत या अभियानाच्या अनावरणासंबंधी माहिती दिली आहे. देशाच्या आरोग्य क्षेत्रासाठी हा मोठा दिवस आहे. या अभियानामुळे आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या मदतीने सुधारणा करण्यात येमार असून, नवीन कल्पनांचे दरवाजे खुले करण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.