पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात PMPML च्या कंत्राटदारांनी तीन महिन्यांपासून बिल थकवल्यामुळे अचानक संप पुकारला होता. या संपामुळे पुणेकरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊन महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार वर्गाचे हाल झाले. जवळपास ८ लाख प्रवाशांवर या संपाचा परिणाम झाला होता. परंतु आता ६६ कोटी रुपयांची थकबाकी मिळाल्याने कंत्राटदारांनी हा दोन दिवसीय संप मागे घेतला आहे.
( हेही वाचा : “पंतप्रधान होणार… मज्जा आहे बाबा एका माणसाची” संदीप देशपांडेंचे ट्वीट चर्चेत )
कंत्राटदारांना ६६ कोटींची थकबाकी दिल्याने संप मागे
सोमवारी कंत्राटदारांना ६६ कोटी रुपये देण्यात आले यामुळे बससेवा पुन्हा सुरू झाली अशी माहिती PMPML चे पुण्याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली आहे. ९९ कोटी रुपयांच्या थकीत बिलांमुळे रविवारी दुपारी कंत्राटदार संपावर गेले होते. त्यामुळे PMPML च्या ९०७ बसेसची सेवा विस्कळीत झाली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सोमवारी पीएमपीएमएल प्रशासनाला ९० कोटी रुपये दिले त्यापैकी ५४ कोटी रुपये पुणे महापालिकेकडून आणि ३६ कोटी रुपये पिंपरी चिंचवड महापालिकेकडून आले. यापैकी ६६ कोटी कंत्राटदारांना देण्यात आले तर २४ कोटी एमएनजीएलला देण्यात येणार आहेत.
कंत्राटदारांनी अनेक वेळा पत्र देऊन सुद्धा वेळेवर थकबाकी देण्यात आली नसल्याने अखेर ओलेक्ट्रा, ट्रॅव्हल टाईम, हंसा, अँथोनी या कंत्राटदारांनी संप पुकारला होता. परंतु आता ६६ कोटी रुपयांची थकबाकी मिळाल्याने कंत्राटदारांनी हा दोन दिवसीय संप मागे घेतला आहे. यामुळे पुणेकरांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.
Join Our WhatsApp Community