… म्हणून पुणे स्टेशन ते पारगाव PMPML ची बससेवा बंद न करण्याची होतेय मागणी

99

पुणे स्टेशन ते पारगाव (ता. दौंड) ही पीएमपीएमएलची बससेवा (मार्ग क्र. १३७) बंद करू नये अशी मागणी पारगाव ग्रामपंचायत व दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती सयाजी ताकवणे व पोपटराव ताकवणे यांनी केली आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त तथा पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना निवेदन दिले आहे. निवेदनात सरपंच जयश्री ताकवणे यांनी म्हटले की, एकट्या पारगावची लोकसंख्या १७ हजार पाचशे आहे. येथील व्यापारपेठ व गूळ उद्योग मोठा आहे. येथून वाघोली तसेच पुणे शहरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी जातात.

(हेही वाचा – पुण्यातील ‘या’ 11 मार्गांवर PMPMLची सेवा होणार बंद!)

गेली २५ वर्षांपासून एसटी (MSRTC) सेवा बंद असल्याने येथील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. या मार्गावरील बससेवा सुरू झाल्याने पारगाव, नानगाव, गलांडवाडी, खुटबाव, पिंपळगाव, राहू, मिरवडी (ता. दौंड), अष्टापूर (ता. हवेली), रांजणगाव सांडस, नागरगाव, वडगाव रासाई, आलेगाव, मांडवगण फराटा (ता. शिरूर) या गावांतील प्रवाशांची सोय झाली आहे. १ डिसेंबरपासून ही सेवा बंद होणार असल्याने या गावांमधील मध्यमवर्गीय ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे.

कितीही प्रयत्न केले तरी या भागात एसटी बससेवा सुरू होऊ शकत नाही. या मार्गावरील पीएमपीएमएल बसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद आहे. तरीही या मार्गावरीव बससेवा बंद करण्याचे कारण माहित नाही, असे पोपटराव ताकवणे व सयाजी ताकवणे म्हणाले. दरम्यान, दौंड, शिरूर व हवेली तालुक्यातील प्रवाशांना ही सेवा सोयीची आहे. ही सेवा सुरू ठेवण्यासाठी आयुक्त बकोरिया व खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.