लॉकडाऊनमध्ये केलेल्या शिकारीची दोन वर्षांनी होतेय विक्री

शनिवारी नागपूर आणि गोंदिया वनविभागाने सापळा रचून बिबट्याची कातडी आणि खवल्या मांजराच्या अवैध विक्रीला चाप बसवला. या विक्रीचा पर्दाफाश केल्यानंतर बिबट्याची कातडी ही किमान दोन वर्ष जुनी असल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. लॉकडाऊन काळात या बिबट्याची शिकार झाली असावी, आता जनजीवन पूर्वपदावर येत असताना शिकाऱ्यांनी वन्यप्राण्यांच्या शिकारीतून हस्तगत केलेले अवयव छुप्या पद्धतीने विकायला सुरुवात केल्याचे वनविभागाच्या धाडसत्रात पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.

असा रचला सापळा

गोंदिया महामार्गावर खजरी गावाजवळ वनाधिकारीच बनावट ग्राहक बनून गेले होते. या धडक कारवाईत पाच आरोपींना वनाधिकाऱ्यांनी पकडले. त्यापैकी दोन आरोपी हे गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून, पुण्यातील खासगी नामांकित कंपनीत नोकरी करत आहेत. त्यांनी पुण्यातून बिबट्याची कातडी रेल्वेमार्गे गोंदियात आणली. आरोपींकडून 3.25 किलो खवल्या मांजराचे खवलेही हस्तगत करण्यात आले. गेल्या दोन वर्षांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही खवल्या मांजराच्या अवैध विक्रीचीही प्रकरणे उघडकीस आली आहेत.

एकाच तपासात मिळाल्या तीन बिबट्यांच्या कातड्या

फेब्रुवारी महिन्यात शहापूर प्रादेशिक वनविभागाने सलग तीन आठवडे सुरू ठेवलेल्या धाडसत्रात नाशिक आणि इगतपुरीतून तीन बिबट्यांच्या कातड्या हस्तगत केल्या. त्यातील एक कातडी बिबट्याची शिकार केल्यानंतर जंगलातच शिकाऱ्यांनी पुरून ठेवली होती. या कारवाईत 22 आरोपींना अटक करण्यात आली होती.

गोंदियातील कारवाई पथक

निखिल नीलकंठ आगडे, कैलास काशिनाथ घुमके, हेमराज ओंकार उके, मिथुन छबिलाल घुमके, मनोज नारद मानकर अशी पाच आरोपींची नावे आहेत. ही कारवाई नागपूर वनविभाग ( प्रादेशिक ) चे मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, उपवनसंरक्षक राहुल गवई, गोंदिया वनविभाग (प्रादेशिक)चे उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वन अधिकारी (दक्षता)पी. जी. कोडापे, उमरेडचे सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार, गोंदियाचे सहायक वनसंरक्षक पाटील, लहू ठोकळ, वाय. डी. तडम, निलेश तिवळे, गणेश जाधव, दिनेश पडवळ, विनोद शेंडे, सुधीर कुलूरकर, संदीप ध्रुवे आणि प्रदीप पाटील यांनी ही कारवाई केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here