कोरोनाच्या २ वर्षांच्या काळात शाळा बंद होत्या, त्या ऑनलाईन सुरु होत्या. राज्य सरकारने महाराष्ट्र निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर मुंबईत सर्वच्या सर्व शाळा सुरु झाल्या. सोमवार, ४ एप्रिल २०२२ हा अनेक शाळांचा पहिला दिवस होता. या पहिल्याच दिवशी सांताक्रूझ येथील पोद्दार शाळेत अभूतपूर्व गोंधळ माजला, ज्यामुळे पालकांनी थेट शाळा गाठल्या. त्यानंतर पोलिसांनी बसचा शोध घेतला, विद्यार्थी सुखरूप घरी पोहचले, मात्र यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी पोद्दार शाळेला मंगळवारी, ५ एप्रिल रोजी चौकशीला बोलावले आहे.
बस चालक नॉट रिचेबल
सरकारने सर्व निर्बंध काढल्यावर पोद्दार विद्यालय ही शाळा पुन्हा सुरु झाली. त्यानुसार या शाळेचा सोमवार, ४ एप्रिल हा पहिला दिवस होता. मुले सुखरूप शाळेत आली. शाळा सुटल्यावर शाळेची बस मुलांना घेऊन दुपारी १२.३० वाजता निघाली. मात्र पुढील ४ तास ही बस अचानक गायब होती. अर्थात ही बस कुणाच्या संपर्कात नव्हती. बसमध्ये असलेला एकही विद्यार्थी त्याच्या घरी पोहचला नव्हता. बस चालकाचा संपर्क होत नव्हता. पालकांचाही संपर्क होत नव्हता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पालकांनी थेट शाळा गाठली आणि ‘आमची मुले गेली कुठे’, अशी विचारणा करायला सुरुवात केली.
(हेही वाचा हिजाब बंदी आता शिक्षकांवरही! कर्नाटकात ‘हा’ घेतला निर्णय)
काय झाला होता गोंधळ?
जेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले तेव्हा पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांनी तातडीने बसचा शोध सुरु केला, तेव्हा काही वेळातच बसचा पत्ता लागला. या बसच्या चालकाला मार्ग माहीत नव्हता, त्यामुळे तो चालक चुकीच्या मार्गावर बस घेऊन गेला. तब्बल ४ तास तो हा बस फिरवत होता. कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे हा सगळा प्रकार घडला आहे, असे समोर आले. विशेष म्हणजे बस चालकाचा मोबाईल बंद होता. त्यामुळे पालकांमध्ये चिंताग्रस्त वातावरण निर्माण झाले होते.
अखेर मुलांची पालकांची भेट झाली
पोलिसांनी या शाळेच्या बसचा शोध घेतल्यानंतर ४ तासांनी बस गाडी सापडली आणि बसमधील मुलांची अखेर पालकांशी भेट झाली. घडल्या प्रकारानंतर शाळा व्यवस्थापन संबंधित बसच्या कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करणार आहे.
Join Our WhatsApp Community