सांताक्रूझ येथील पोद्दार शाळेत अभूतपूर्व गोंधळ झाल्याने पालकांनी थेट शाळा गाठली. शाळा सुटल्यावर शाळेची बस मुलांना घेऊन दुपारी १२.३० वाजता निघाली. मात्र पुढील ४ तास ही बस गायब होती. प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक स्कूल बस थांबा, शाळेत दाखल झाले होते, शाळेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, अखेर साडेचार वाजता मुले सुखरूप घरी पोहचू लागली आणि पालकांचा टांगणीला लागलेला जीव भांड्यात पडला.
( हेही वाचा : पालकांना बाऊन्सर्सकडून पुन्हा मारहाण! )
“माझा मुलगा सकाळी ५ वाजता घरातून बाहेर पडला होता, दुपारी तो दीडच्या आसपास घरी पोहोचायला पाहिजे होता, मात्र तो घरी न आल्यामुळे माझ्या पत्नीने मला फोन करून कळविले, मी कार्यालयातून थेट शाळेत दाखल झालो, शाळा प्रशासनाला याबाबत विचारले असता, बस कंत्राटदार यांच्याकडे चौकशी करा असे उत्तर देऊन शाळा प्रशासनाने जबाबदारी झटकली अशी माहिती पालक शशांक विरकूट यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलताना दिली”.
माझा मुलगा साडेचार वाजता घरी पोहोचला, मुलगा घरी आला तेव्हा त्याच्या शरीरात त्राण उरला नव्हता, याला जबाबदार कोण आहे? आम्ही याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहोत.
– डॉ. अमित रणदिवे, पालक
रस्ता माहित नसल्याने उशीर
सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला सांगितले की, आज शाळेचा पहिला दिवस होता, त्यात बसवरील चालक आणि अटेंडन्ट हे नवीन असल्यामुळे त्यांना रूटबाबत जास्त माहिती नसल्यामुळे स्कूल बसेस पोहचण्यास उशीर झाला, मुले सुखरूप घरी पोहचली असून पालकांची तक्रार असल्यास दाखल करून घेऊ.
पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, ही शाळा लॉकडाऊननंतर सोमवारी प्रथमच सुरु झाली. शाळेचा पहीला दिवस असल्याने व बस चालक नवीन असल्यामुळे दुपारी १२.३० वा. शाळा सुटल्यानंतर काही मुलांचे पालक मुलांना घेवून जाण्याकरीता आले. म्हणून काही मुलांना बसमध्ये बसण्यास उशीर झाला. तसेच एका बसचा चालक नवीन असून त्यास रस्ता माहित नसल्याने २५ ते ३० मुलांना शाळेतून घरी पोहचण्यास उशीर झाला. नमूद बसचा चालक नवीन असल्यामुळे आणि त्यांना रस्ता माहित नसल्याने सदरची बस विहित वेळेपेक्षा उशिरा घरी पोहचल्याचे आढळून आले आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ.शिवाजी राठोड (अभियान) यांनी दिली.
शाळेचे म्हणणे काय ?
याबाबत शाळा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रक काढून विद्यार्थी आणि पालकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. यापुढे स्कूल बसेसची वाहतूक सुरळीत करू तत्पूर्वी बसवरील चालक आणि अटेंडन यांना याबाबत प्रशिक्षण देऊ असे शाळेने म्हटले आहे. आम्ही विद्यार्थी आणि पालक सतत देत असलेल्या पाठिंब्याबद्दल आभारी आहोत आणि भविष्यात आजच्या समस्यांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेऊ असेही शाळा प्रशासनाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community